बहुचर्चित व बहुप्रतिक्षित वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’चा दुसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रेक्षक आतुरतेने या सीरिजची वाट पाहात होते. मात्र याच वेब सीरिजमुळे एका व्यक्तीच्या डोक्याला ताप झाला आहे. १५ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर ‘सेक्रेड गेम्स२’ प्रदर्शित झाला आणि त्याच दिवसापासून या व्यक्तीला दिवसरात्र फोनकॉल्स येत आहेत. जगभरातून येणाऱ्या कॉल्समुळे हा व्यक्ती वैतागला आहे.

संयुक्त अरब अमिरातीत राहणाऱ्या कुन्हाब्दुल्ला या भारतीयाचा फोन नंबर ‘सेक्रेड गेम्स २’मध्ये एका काल्पनिक गँगस्टर सुलेमान इसा याचा असल्याचा दाखवलाय. त्यामुळे जगभरातून त्याला फोन येत आहेत. ”गेल्या तीन-चार दिवसांपासून मला भारत, पाकिस्तान, नेपाळ अशा विविध ठिकाणांहून फोन येत आहेत. नेमकं काय झालंय हेच मला समजत नाहीये. आता फोनची रिंग जरी वाजली तरी चिड येत आहे. मला माझा नंबर रद्द करायचा आहे,” असं कुन्हाब्दुल्ला म्हणाले.

कुन्हाब्दुल्ला हे ३७ वर्षांचे असून तिथल्या एका स्थानिक तेल कंपनीत नोकरी करतात. त्यांनी ‘सेक्रेड गेम्स’ हे नावसुद्धा कधी ऐकलं नव्हतं. ”सेक्रेड गेम्स काय आहे? एखादा व्हिडीओ गेम आहे का? मी सकाळी आठ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत काम करत असतो. अशा गोष्टींसाठी माझ्याकडे वेळसुद्धा नाही. कॉल करणारा प्रत्येकजण मला इसा म्हणून हाक मारतोय. कोण आहे इसा? मला त्या व्यक्तीशी काहीच घेणंदेणं नाही,” असं ते म्हणाले.

Video : बिग बॉसच्या घरातील नेहाचा ‘मुंगळा’ डान्स होतोय व्हायरल

‘सेक्रेड गेम्स २’मधील एका सीनमध्ये केनियातील भारतीय अंडरकव्हर एजंट गणेश गायतोंडेला (नवाजुद्दीन सिद्दीकी) एक चिठ्ठी देतो आणि गँगस्टर इसाचा नंबर त्यावर लिहिल्याचं सांगतो. हा फोन नंबर स्क्रीनवर जरी स्पष्ट दिसत नसला तरी सबटायटलमध्ये तो दिसतो. म्हणूनच कुन्हाब्दुल्ला यांना देशभरातून कॉल्स येत आहेत.

परदेशी वृत्तसंस्थांनी हे वृत्त दाखवल्यानंतर नेटफ्लिक्सने कुन्हाब्दुल्लांची माफी मागितली. ‘तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही तुमची माफी मागतो. आम्हाला या घटनेची माहिती मिळताच फोन नंबर सबटायटलमधून काढण्यात आला आहे,’ अशी माहिती नेटफ्लिक्सने दिली.