साखरपुड्यानंतर अभिनेत्री सागरिका घाटगे आणि माजी क्रिकेटर झहीर खान एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याला प्राधान्य देताना दिसतायत. त्रिनिदादमध्ये झहीरसोबत सुट्ट्यांचा आनंद घेताना असो किंवा जमैकामध्ये महेंद्र सिंग धोनीची पत्नी साक्षी आणि शिखर धवनची पत्नी आएशा धवन यांच्यासोबत घालवलेला वेळ असो सागरिका सोशल मीडियावरून प्रत्येक लहानमोठ्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. सध्या सागरिका आणि झहीर लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.

लंडनमध्ये सानिया मिर्झा आणि तिचा पती शोएब मलिक यांच्यासोबतही दोघांनी वेळ घालवला असून हे क्षण सागरिकाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये काही अभिनेते आणि क्रिकेटरसुद्धा पाहायला मिळत आहेत. आशिष नेहरा, अजहर महमूद आणि ‘लव्ह स्टोरी २०५०’चा अभिनेता हरमन भवेजा हेदेखील या फोटोमध्ये दिसत आहेत. याआधी सागरिकाने न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्कमध्ये झहीरसोबत फिरतानाचा एक फोटो पोस्ट केला होता.

काही दिवसांपूर्वीच झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगेचा साखरपुडा झाला. अंगठीचा फोटो शेअर करत सागरिकाने सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. या साखरपुड्याला भारतीय संघाचे अनेक माजी आणि आजी खेळाडू उपस्थित होते. विविध बॉलिवूड तारकांनीही हजेरी लावली होती. दोघांनी लग्नाच्या तारखेचा जरी अद्याप खुलासा केला नसला तरी यावर्षाच्या अखेरीस दोघेही विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.

बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील जोड्या आजपर्यंत नेहमीच चर्चेत राहिल्या, मग ते विराट कोहली आणि अनुष्का शर्मा असो किंवा झहीर आणि सागरिका. सागरिकाने बॉलिवूडसोबतच पंजाबी आणि मराठी चित्रपटांमध्येही भूमिका साकारली.