प्रसिद्ध दिग्दर्शिका- निर्मात्या विनता नंदा यांनी ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला. आलोक नाथ यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे बॉलिवूडमधल्या अनेकांना धक्का बसला. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर राग व्यक्त केला. या प्रकरणात मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरनेही ट्विटरच्या माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर आलोक नाथ यांच्यावर भाष्य करणारी सई नाना पाटेकरांवरील आरोपांवर काहीच बोलली नाही, अशी टीका तिच्यावर झाली. या टीकाकारांना सईने सडेतोड उत्तर दिलं आहे.

सईने ट्विटरवर लिहिलेली पोस्ट-

‘का एवढा राग? कारण जेव्हा एखादी व्यक्ती बलात्कार झाल्याचा आरोप करते, तेव्हा सर्वांत आधी आपण पुराव्यांची मागणी करतो. यावरूनच आपली मानसिकता कशी आहे, हे दिसून येते. यामध्ये मराठी असण्याचा किंवा नसण्याचा प्रश्न नाही. जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे, मग ती चूक करणारी व्यक्ती कोणीही असो. काही महिला या मोहिमेच्या माध्यमातून चुकीचे आरोपसुद्धा करत आहेत. त्यांना मी सांगू इच्छिते की, या मोहिमेला भरकटवू नका.’

‘ज्या काही घटना समोर येत आहेत, आजूबाजूला जे घडतंय, ते पाहून मला खूप मोठा धक्का बसला आहे. या घटनांवर लोक कसे विचार करतात, ते पाहून अधिक दु:ख होतं. #MeToo मुळे बदलाचे वारे वाहू लागलेत असं मला वाटतं. महिला किंवा पुरुष असो, लैंगिक शोषण हे थांबलंच पाहिजे.’

तुम्ही कधीच शांततापूर्ण आयुष्य जगू शकणार नाही, तुम्ही नरकातच सडणार असं ट्विट करत सईनं विनता नंदा आणि मी टू मोहिमेला पाठिंबा दर्शवला. तसेच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सईनं तनुश्री दत्तालाही पाठिंबा दर्शवला आहे. तनुश्रीनं नाना पाटेकर यांच्यावर जे काही आरोप केले आहेत ते ऐकून मला धक्का बसला आहे. मात्र तिच्या आरोपात तथ्य असेल तर नाना पाटेकर यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे असंही ती म्हणाली आहे.

 

Story img Loader