तैमुरचे स्टारडम हे कोणत्याही सुपरस्टारपेक्षा कमी नाही. तो कुठेही दिसला तरी प्रसारमाध्यमांच्या नजरा त्याच्याकडेच वळतात. सैफ आणि करिना जरी त्याच्यासोबत असले तरी चर्चा फक्त तैमुरचीच होते. सोशल मीडियावर त्याच्याबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या जातात. काहींना तो आवडतो तर काही त्याचा द्वेष करतात. पण या गोंडस मुलाकडे पाहून कोण कसा द्वेष करु शकतो, असाच प्रश्न पडतो. तैमुरचे प्रसारमाध्यमांमध्ये असणारे क्रेझ पाहता आता करिना आणि सैफने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

करिना आणि सैफला त्याच्यावर असणाऱ्या नजरांची आता भीती वाटू लागली आहे. त्याच्याभोवती असणारा माध्यमांच्या गराड्यामुळे त्याचे बालपण हरवून तर नाही ना, जाणार हाच प्रश्न त्यांना आता पडला आहे. म्हणूनच ते तैमुरला प्रसारमाध्यमांपासून दूर इंग्लंडमधील एका चांगल्या बोर्डिंग स्कुलमध्ये घालणार आहेत. एका मुलाखतीत सैफ म्हणाला की, ‘त्याच्या डोळ्यात निष्पापपणा दिसतो. त्याचे बालपण या कॅमेऱ्यांच्या झगमगाटात हरवायला नको असे मला आणि करिनाला वाटते. आमचे अनेकदा यावर बोलणेही झाले आहे. म्हणूनच आम्ही त्याला बोर्डिंगमध्ये टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या कुटुंबातील प्रत्येकजणच बोर्डिंग स्कुलमध्ये जाऊन राहिला आहे.’

सैफही वयाच्या नवव्या वर्षापासून इंग्लंडमध्ये बोर्डिंग स्कुलमध्ये होता. त्याच्यानंतर इब्राहिमही इंग्लंडमध्ये शिकायला होता. आता त्यांच्या घराची ही प्रथा तैमुरलाही पाळावी लागणार असेच दिसते. एका वृत्तपत्राशी बोलताना सैफ म्हणाला की, ‘तैमुरला हे कळले पाहिजे की प्रसारमाध्यमांच्या मार्फत त्याच्याकडे २४ तास पाहिले जाते. याचे जेवढे फायदे आहेत तेवढ्याच जबाबदाऱ्याही आहेत.’ आता तैमुर जरी दूर जाणार असला तरी तो नक्की कधी जाणार, हे मात्र त्यांनी सांगितलेले नाही. मात्र, त्यासाठी निश्चितच आणखी काही वर्षं लागतील. तोपर्यंत सैफ-करिना त्याला प्रसारमाध्यमांच्या नजरेपासून कसे वाचवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Story img Loader