अभिनेता सैफ अली खानने नुकत्याच एका मुलाखतीत तैमुरच्या टोपणनावाचा खुलासा केला. चित्रपट समीक्षक राजीव मसंद आणि अनुपम चोप्रा यांना दिलेल्या एका मुलाखतीत सैफने तैमुरला घरी सर्वजण प्रेमाने कोणत्या नावाने हाक मारतात याबद्दल माहिती दिली.

लहान वयातच तैमुरवर स्टारडमचा मारा होऊ लागला तर तू त्यावर कशाप्रकारे व्यक्त होशील असा प्रश्न सैफला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तो म्हणाला की, ‘जेव्हा त्याला स्टारडमचा अर्थ समजू लागेल त्यावेळी त्याच्याबरोबर याविषयासंदर्भात चर्चा करणे योग्य असेल. त्याला सर्व काही शिकवले जाईल आणि ते अगदी शिस्तबद्ध असेल. घरी कोणी आल्यावर धन्यवाद, या बसा नमस्कार कसं म्हणावं इथपासून सर्व काही त्याला समजवलं जाईल. लहानपणापासूनच वागण्याबोलण्याची शिस्त लावली जाईल.’

ज्याप्रकारे साराचं संगोपन सैफने केलं, त्याचप्रकारे तैमुरचंही करणार असल्याचं त्याने म्हटलं. ‘तो जेव्हा नमस्ते म्हणायला शिकेल, तेव्हा मला खूप आनंद होईल. तुम्ही साराला लहानपणी ‘आदाब’ करताना पाहिले आहे का? तसंच अगदी. आम्हाला टीमकडूनही तीच अपेक्षा आहे. टीमने केलेला छानसा ‘आदाब’.’ या भावना व्यक्त करत असतानाच सैफने तैमुरचे टोपणनाव सांगितले.