सैफ अली खानचा ‘शेफ’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये तो शेफची (आचारी) भूमिका साकारत आहे. भूमिकेत जिवंतपणा आणण्यासाठी कलाकार कठोर मेहनत घेत असतात. भूमिकेनुसार ते संबंधित प्रशिक्षणही घेतात. सैफनेसुद्धा या भूमिकेसाठी स्वयंपाकाचं चांगलंच प्रशिक्षण घेतलं होतं. यासंदर्भात ‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाचे दिग्दर्शक राजा कृष्ण मेनन यांनी बरेच किस्से सांगितले.

पास्ता ही सैफची आवडती डिश आहे. पण ते तयार करण्यासाठी सैफला जवळपास पाच तास लागायचे. मात्र भूमिकेसाठी घेतलेल्या प्रशिक्षणानंतर त्याच्यामध्ये बरेच बदल झाले. ‘प्रशिक्षणानंतर सैफ चांगलं जेवण तयार करू लागला. कांदा कापण्याचं प्रशिक्षण त्याला काही दिवस दिलं होतं. माझ्या मते त्याने जवळपास पाच हजार कांदे कापले असतील. नुकताच मी त्याच्या घरी गेलो होतो, तेव्हा माझ्यासाठी त्याने स्वत: पास्ता तयार केला होता. ज्या डिशसाठी त्याला आधी पाच तास लागायचे ते त्याने अवघ्या काही मिनिटांमध्ये केलं,’ असं राजा कृष्ण मेनन म्हणाले.

PHOTO : स्मृती इराणी यांचा ‘द करण जोहर सेल्फी’!

‘शेफ’ चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, विक्रम मल्होत्रा आणि ‘बांद्रा वेस्ट पिक्चर्स’ यांनी केली आहे. २०१४ साली प्रदर्शित झालेला ‘शेफ’ हा मूळ हॉलिवूड चित्रपट एका व्यावसायिक शेफवर आधारित होता. स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी तो नामांकित रेस्तराँमधील नोकरी सोडतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यात आलेले अनुभव आणि स्वतःचे हॉटेल सुरु करताना होणारा आनंद यात चित्रीत करण्यात आलेला.