इंग्रज येण्यापूर्वी भारत ही संकल्पना नव्हती असं विधान करणाऱ्या सैफ अली खानवर नेटकरी संतापले आहेत. सोशल मीडियावरून सैफवर टीकांचा भडीमार होत आहे. ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाच्या निमित्ताने सैफने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने चित्रपटात दाखवलेल्या इतिहासावरही प्रश्न उपस्थित केला आहे.

चित्रपटामध्ये काही ऐतिहासिक घटनांशी छेडछाड किंवा बदल करण्यात आल्यासंबंधी विचारलं असता सैफ म्हणाला, “काही कारणांमुळे मी याआधी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली नाही. कदाचित पुढच्या वेळी मांडेन. पण मला दिलेली भूमिका खूप चांगली असल्याने ती साकारण्यासाठी मी उत्साही होतो. पण जेव्हा लोक म्हणतात की हाच इतिहास आहे, तर मी त्यांच्याशी सहमत नाही. इतिहास काय आहे हे मला नीट माहित आहे. इंग्रज येण्याआधी भारत ही संकल्पना नव्हती.” सैफच्या याच विधानावरुन नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे.

ब्रिटिश येण्यापूर्वी तर भारत ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती तर त्यांनी ‘ईस्ट इंडिया कंपनी’ हे नाव कशाच्या आधारे ठेवलं होतं, असा प्रतिप्रश्न नेटकऱ्यांनी सैफला विचारला. सैफची ही मुलाखत सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – ‘तान्हाजी’मध्ये दाखवला आहे तो इतिहास नाही – सैफ अली खान

‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात सैफने उदयभान राठोडची भूमिका साकारली आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाने दहा दिवसांत बॉक्स ऑफिसवर कमाईचा १५० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.