चरित्रपटांमध्ये रमणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच बॅडमिंटनपटू सायना नेहवालची भूमिका साकारताना दिसणार आहे. सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येणार असल्याची माहिती याआधीच सर्वांना कळली होती. या भूमिकेसाठी श्रद्धाने जोरदार तयारी सुरू केली आहे. सायनाच्या जीवनातील काही महत्त्वांच्या टप्प्यांवर या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात येणार आहे. त्यातीलच एका महत्त्वाच्या दृष्यासंदर्भातली माहिती सध्या समोर येत आहे.

भूषण कुमार निर्मित आणि अमोल गुप्ते दिग्दर्शित या चित्रपटात बॅडमिंटनमधील सायनाचा प्रवास, तिच्या करिअरमधील चढउतार या सर्व गोष्टी दाखवण्यात येणार आहेत. मात्र त्यासोबतच अशाही काही घटनांचा त्यात समावेश असेल जे फार कमी लोकांना माहित आहे. सायना नेहवाल आणि पी.व्ही.सिंधू यांच्यामध्ये झालेला वाद चित्रपटामध्ये दाखवणार असल्याची माहिती ‘स्पोर्ट्सकीडा’ या वेबसाइटने दिली आहे. आता या दोघांमध्ये नेमका काय वाद होता आणि त्याचं कारण काय होतं, हे येत्या काळात स्पष्ट होईलच.

वाचा : तिने जुळ्यांना जन्म दिला, पण…

सध्या श्रद्धा सायनाच्या आत्मचरित्रपटात काम करण्यासाठी घाम गाळताना दिसत आहे. श्रद्धाने नुकताच सायनासोबतचा बॅडमिंटनचा सराव करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. खेळताना सायनाची देहबोली कशी असते याचे बारकावे सध्या ती शिकत आहे. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये सायना तिला काही महत्त्वाच्या टिप्स देत असल्याचे दिसते.