‘सैराट’ सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी सैराट म्हणजे काय रं भाऊ? असा प्रश्न अनेकांना पडायचा. पण आता सैराटचा अर्थ काहीही असो हा शब्द कानी पडला तरी फक्त नागराज मंजुळेचाच सिनेमा डोळ्यासमोर येतो. ‘सैराट’ म्हणजे कुठलीही बंधनं न मानता मनमोकळं जगणं, वावरणं.. ‘पिस्तुल्या’पासून ‘फँड्री’ ते अगदी ‘सैराट’पर्यंत पोहोचलेल्या नागराजच्या सिनेमांची वाटही अशीच सैराट आहे हे लक्षात आल्याशिवाय राहत नाही. पिस्तुल्या, फँड्री आणि सैराटला राष्ट्रीय पुरस्कारांचा बहुमान मिळाला. केवळ मनोरंजनासाठी किंवा पुरस्कारासाठी सिनेमा न काढता समाजाचे प्रबोधन होईल, या उदात्त हेतूने हे सिनेमे प्रभावित झालेले दिसतात. असे असून देखील नेहमीच्याच वाटेने न जाता नागराजचे सिनेमे चाकोरी बाहेरचे वास्तव आपल्याला दर्शवतात.

एक उनाड मुलगा ते राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवणारा दिग्दर्शक असा नागराजचा प्रवास अनेकांनाच खूप काही शिकवून जातो. स्वप्न फक्त पाहायची नसतात तर ती पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करायचं असतं ही शिकवण नागराजच्या आयुष्याकडे पाहून नक्कीच मिळते.

वडार समाजात जन्मलेल्या नागराजला पहिल्यापासूनच शिक्षणाची ओढ होती. पण शिक्षण घ्यावे अशी परिस्थिती नव्हती. पण तरीही प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढत नागराज शिकला. शाळेत असतानाच सिनेमा पाहण्याची आवड मनात रुजली आणि ती आवड कालांतराने जगण्याचं उद्दिष्ट बनली. शाळा बुडवून नागराज अनेकदा सिनेमे पाहायला जायचा. गोष्टी ऐकायला त्याला फार आवडायच्या. आई आणि आत्या त्याला लहानपणी गोष्टी सांगायच्या तेव्हा तो त्या जगात रमून जायचा. नागराजने पदवीपर्यंतचे शिक्षण जेऊर इथे पूर्ण केले. नंतर तो पुढील शिक्षणासाठी पुणे विद्यापीठात शिकायला गेला. मराठी विषयात एम.ए. करताना केशवसुत, मर्ढेकर, अरूण कोल्हटकर, नामदेव ढसाळ त्याला नव्याने भेटत गेले आणि अधिक जवळचे वाटत गेले. यातूनच पुढील आयुष्यात ‘उन्हाच्या कटाविरुद्ध’सारखा आशयघन कवितासंग्रह लिहिण्याची त्याला प्रेरणा मिळाली. केवळ सिनेमातूनच नाही तर तो कवितेच्या माध्यमातूनही व्यक्त होत असतो.

नागराजचा फँड्री हा सिनेमा लोकांना अधिक भिडला. त्यात प्रखर सामाजिक भाष्य होतं. तसं ते सैराटमध्येही होतं. पण सैराटची मांडणी पूर्णतः वेगळ्या पद्धतीची होती. ‘फँड्री’नंतर नागराज त्याच सामाजिक चौकटीतून बोलणार अशी काहीशी लोकांची धारणा होती पण जातीपातीपलीकडे जाऊन सिनेमा करणारा दिग्दर्शक म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं.

आजूबाजूला एवढी प्रतिकूल परिस्थिती असतानाही नागराज सगळ्यांपेक्षा वेगळा कसा घडला असा प्रश्न अनेकांना पडतो. याचं श्रेय नागराज आपल्या जडणघडणीला देतो. मी लहानपणी खूप विचित्र घरात वाढलो. मी ज्या जातीत वाढलो तिथे अज्ञान, हाणामारी-रक्तपात, दारू पिणे या सगळ्या सामान्य गोष्टी आहेत. बायकांना मारणं, बायकांनी एकमेकांशी मारामारी करणं हे रोजचं आहे. त्यातून माझ्यावर वेगळा संस्कार कसा झाला हे माहीत नाही, पण आपण द्वेष करता कामा नये. रागाने राग वाढतो हे मला त्या वयातच कळून चुकलं होतं. कुणी द्वेष केला तर मी त्याच्यावर प्रेम करीन ही एकच शक्यता आहे; ज्याने राग संपेल असं माझ्या मनात कायम यायचं, असं नागराज आवर्जून सांगतो.

त्याच्या विचारांवर एका कादंबरीचा फार परिणाम झाला होता. ‘पिक्चर ऑफ डोरियन’ नावाची कादंबरी त्यानं वाचली होती. त्यात एका चित्रकाराला निष्पाप मुलाचं चित्र काढायचं असतं. त्यासाठी तो खूप फिरतो आणि त्याला गावात एक मुलगा दिसतो, कदाचित तो डोरियन असावा. तो त्या निष्पाप मुलाचं चित्र काढतो. नंतर चाळीस एक वर्षांनी याच चित्रकाराला सर्वात क्रूर माणसाचं चित्र काढायचं असतं आणि म्हणून तो अनेक तुरुंग पालथे घालतो. तिथे त्याला एक खूप कुरूप आणि क्रूर अशी व्यक्ती भेटते. त्याचं चित्र काढत असताना त्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा तो क्रुर माणूस चित्रकाराला आठवण करून देतो की लहानपणी निष्पाप मुलगा म्हणून तू माझंच चित्र काढलं होतं. या गोष्टीचा माझ्यावर खूप परिणाम झाला. सुंदर गोष्टही क्रूर होऊ शकते. द्वेषाचं उत्तर द्वेष होऊ शकत नाही हे तेव्हाचं मनाशी खूप पक्कं बसलं. ज्याने मला दु:ख दिलं त्याला त्याचं आनंदाचं फूल करून त्या माणसाला परत देणं यातच खरं माणसाचं कौशल्य आहे. त्यामुळे आपण कितीही वाईट अनुभव घेतले असले तरी त्याचा राग आपल्या सिनेमातून दिसणार नाही, असा नागराजचा निश्चय आहे.

सैराटने तिकीट बारीवर ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे घेतली. फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात सैराटने लोकांना अक्षरशः वेडं केलं. बॉलिवूडकरांनाही नागराजच्या या सिनेमाचा तिकीट बारीवर फटका बसला. पण या सर्व गोष्टींनी नागराज हुरळून गेला नाही. त्याच्या मनात आजही एक वेगळीच खंत आहे, ती म्हणजे लोकांनी सैराट सिनेमावर प्रेम केलं पण त्यांना सिनेमा नक्की कशावर होता ते कळलंच नाही. सिनेमाच्या माध्यमातून जी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला ते सोडून लोकांना सगळं कळलं. लोकांना झिंगाट कळलं, सैराट कळलं, आर्ची, परशा एवढंच काय तर १०० कोटीही कळले, मात्र प्रबोधन झालेच नाही, अशी खंत नागराजने एका कार्यक्रमात व्यक्त केली होती. “कुणी कोणाला मारू नये, हिंसा करू नये, किमान एवढं तरी ज्ञान या सिनेमातून घ्यायला हवं होतं असं मला वाटतं. पण सिनेमातून हा मेसेज घ्यायचा सोडून लोकांना झिंगाट कळलं, सैराट कळलं, आर्ची कळली, परशा कळला, १०० कोटी कळले, सगळं जग कळतं. पण ‘ऑनर किलिंग’सारखे प्रकार कळले नाहीत. मग समाजप्रबोधन कसं होणार असा प्रश्न त्याला नेहमीच सतावतो. गंभीर विषयावर सिमेना काढूनही तो लोकप्रिय ठरू शकतो हे नागराजनेच आपल्याला दाखवून दिले. भविष्यातही तो याच प्रकारच्या सिनेमाच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि मनोरंजन करत राहील, असा विश्वास सर्वांना वाटतो.

#SairatMainia तुम्हाला कसा वाटतोय… तुमच्या काय आठवणी आहेत… ते सुद्धा आम्हाला नक्की कळवा… loksatta.express@gmail.com  या ईमेल आयडीवर….