गेल्यावर्षी ‘सैराट’ चित्रपट आल्यानंतर आर्ची, परश्या, लंगड्या, सल्या, प्रिन्स यांची क्रेझ सर्वांमध्येच पाहायला मिळाली. लोकांवर या कलाकार मंडळीची इतकी झिंग चढली की ‘सैराट’मधली दृश्य हुबेहुब करून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. त्याचप्रमाणे या पात्रांवरचे काही विनोदही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या चित्रपटामुळे ‘मेहुणा’ या शब्दाची जणू काही दहशतच निर्माण झाली होती. ‘मेहुण्याला कधीही घरी बोलावू नका…. काय माहिती कधी तुमचा गेम करेल….’ अशा प्रकारचे अनेक विनोद व्हायरल झाले होते. असा हा दहशत निर्माण करणारा मेहुणा साकारला होता सूरज पवार याने. ‘पिस्तुल्या’मधल्या या हिरोनं ‘सैराट’मध्ये खलनायकाच्या भूमिकेतही एक वेगळी छाप पाडली. ‘पिस्तुल्या’मध्ये पारधी समाजातील मुलगा, ‘फँड्री’तील जब्याचा दोस्त आणि ‘सैराट’मधील आर्चीचा भाऊ भूमिकेनंतर आजच्या घडीला सूरजचे एका शब्दात वर्णन करायचं तर नागराज मंजुळेचा तो ‘नागमणी’च आहे.
वाचा : #SairatMania : हॅलो… तानाजी आहे का?
वयाच्या केवळ १५व्या वर्षी या मुलानं खलनायक साकारला. प्रेक्षक हिरोची जितकी प्रशंसा करतात त्याच्या दुप्पट खलनायकाचा राग राग करतात. या सगळ्यात ते एक गोष्ट विसरून जातात की खलनायक हे केवळ एक पात्र असतं. वैयक्तिक आयुष्यात ती व्यक्ती तशी नसते. असाच एक अनुभव एकदा सूरजला आला. त्याबद्दल ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला तो म्हणाला, ‘सैराट’ चित्रपटानंतर सल्या आणि बाळ्यासोबत मी कुरुंदवाडीच्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. यावेळी मला पाहताच एका व्यक्तीने शिव्या द्यायला सुरूवात केली. आर्ची-परश्याला का मारलंस असं विचारायला लागला. यावर मी काहीही न बोलता शांतपणे गाडीत जाऊन बसलो.’
वाचा : #SairatMania : .. म्हणून अरबाजवर आली रडण्याची वेळ!
अल्पवयात हिरो ते खलनायकाचा प्रवास करणाऱ्या सूरजला खरं प्रकाशमय करण्याचं सारं श्रेय तसं नागराजच. नागराजच्या आतापर्यंतच्या सर्व चित्रपटात स्थान मिळवलेल्या प्रिन्स अर्थात सूरजसाठी नागराज म्हणजेच आई-बाबा. सूरजला आई-वडील नाहीत. ‘पिस्तुल्या’ केल्यावर जवळपास ९-१० वर्षांचा असल्यापासून तो नागराजच्या कुटुंबासोबत राहतोय. या कुटुंबाने त्याला आपलंस करून त्यांच्या घरातील सदस्य बनवून घेतलं आहे. तो स्वत:ही अण्णा माझ्यासाठी सर्वकाही असल्याची प्रांजळ कबुली देतो. अण्णाने मला घडवलं, अण्णाच माझा मार्गदर्शक असल्याचे त्याने सांगितले. यंदा दहावीची परीक्षा दिलेला सूरज नागराजच्या छत्रछायेखाली त्याच्या आयुष्याची स्वप्नं रंगवत आहे. यापुढं चित्रपटात काम मिळालं तर नक्की करेन, पण चित्रपट म्हणजे आयुष्य नाही. मला खूप शिकायचं आहे. शिकल्यानंतरच मला माझा मार्ग निवडणं अधिक सोपं जाईल, हे सांगण्यासही सूरज विसरला नाही.
वाचा : #SairatMania : जुळून येती ‘सैराट कयामती’..
#SairatMainia तुम्हाला कसा वाटतोय… तुमच्या काय आठवणी आहेत… ते सुद्धा आम्हाला नक्की कळवा… loksatta.express@gmail.com या ईमेल आयडीवर…
चैताली गुरव, chaitali.gurav@indianexpress.com