असं म्हणतात की अस्सल नागाचा दंश पाणी मागू देत नाय. माणूस जागीच खल्लास होतो. नागराजच्या फुसकाऱ्यात असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. त्यानं गावातल्या चिल्लर पोरांना घेऊन मांडलेला ‘खेळ’ असा काही रंगला की वर्ष सरलं तरी खेळातली नशा काही केल्या संपायचे नाव घ्यायला तयार नाही. ‘सैराट’ कलाकृतीचे इतर चित्रपटसृष्टीला लागलेल्या वेडानं आणखी काही दिवस ही झिंग कायम राहणार यात तिळमात्र शंका नाही.

‘जे न्यारं असतं त्याच वार वाहतं’ सैराटच्या कथेबाबतीत असंच काहीसं पाहायला मिळतंय. अन् नागराजचा हा चित्रपट सर्वोत्कृष्ट असल्याचं सिद्ध होतं. आता चित्रपटसृष्टीत याडं लावणारा हा एकमेव चित्रपट आहे असे आम्हाला म्हणायचे नाही. कारण हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायकाचा ‘शोले’ आणि बॉलिवूड बादशाहाचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ अर्थात ‘डीडीएलजे’ या कलाकृती सिनेरसिक आजही विसरलेले नाहीत. तर ‘पिंजरा’ चित्रपटातील मास्तर आजही काहींच्या अगदी मनाला स्पर्शून जातो. पण सैराट वेगळा ठरतो तो नागराजनं निवडलेल्या पोरांमुळं, गाण्यांमुळं आणि कथेमुळं.

चित्रपटामुळे प्रसिद्धी मिळविणारे अल्पवयीन सितारे कोण, असा प्रश्न जेव्हा विचारला जाईल तेव्हा नागराजच्या नजरेनं हेरलेल्या आर्ची, परशा, सल्या, प्रदिप (लंगड्या), मंग्या अन् प्रिन्सबाबाचं नाव आवर्जून घेतले जाईल. ‘सैराट’च्या प्रदर्शनाला या महिन्यात वर्ष पूर्ण होते आहे. २९ एप्रिलला प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची चर्चा आजही झिंगाट सुरु आहे. आर्ची सध्या काय करते? आनीची कहाणी काय आहे? सल्या-लंगड्याशिवाय परशाच काय सुरु आहे? हे प्रश्न अधूनमधून चर्चेत येतच असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रागाचा त्रागा दाखविणारा प्रिन्सदादा अन् मंग्या या साऱ्यांसह नागराजच्या नजरेला आणि अजय-अतुलच्या संगीताला दाद म्हणून पुन्हा एकदा सैराटच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत खास तुमच्यासाठी #SairatMainia फक्त लोकसत्ता डॉट कॉमवर. या नव्या कल्पनेतून पुन्हा एकदा झिंगाट व्हायला तयार राहा! बोर्डाच्या परीक्षेत आर्ची आणि प्रदीपचं काय होणार? हे समजण्यापूर्वीच पुन्हा एकदा सैराट होऊया! अन् मग रिंकूच्या नव्या चित्रपटासह तिच्या बोर्डाच्या निकालाची वाट पाहूया!.. तोपर्यंत #SairatMainia तुम्हाला कसा वाटतोय… तुमच्या काय आठवणी आहेत… ते सुद्धा आम्हाला नक्की कळवा… loksatta.express@gmail.com  या ईमेल आयडीवर….