प्रसिद्ध टेलिव्हिजन आणि बॉलिवूड अभिनेत्री साक्षी तन्वरच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. साक्षीने एका मुलीला दत्तक घेतलं असून तिचं नाव ‘दित्या’ असं ठेवलं आहे. नऊ महिन्यांच्या दित्याला साक्षीने दसऱ्याच्या दिवशी दत्तक घेतलं. विजयादशमीला आपल्या घरी जणू लक्ष्मीचं आगमन झाल्याची भावना साक्षीने व्यक्त केली आहे.
मुलीचं नाव दित्या ठेवण्यामागचं विशेष कारणसुद्धा साक्षीने सांगितलं. दित्या हे देवी लक्ष्मीचंच एक नाव असून जी भक्तांच्या सर्व प्रार्थना ऐकून त्यांना उत्तर देते असा त्याचा अर्थ होतो. ‘कहानी घर घर की’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली साक्षी तन्वर मोठ्या पडद्यावरही तितक्याच ताकदीने भूमिका साकारताना पाहायला मिळते. ‘दंगल’, ‘मोहल्ला अस्सी’ यांसारख्या चित्रपटात तिने भूमिका साकारल्या आहेत. तर ‘बडे अच्छे लगते है’ ही तिची मालिकासुद्धा खूप गाजली होती.
वाचा : २० वर्षांनंतर प्रशांत दामले घेऊन येत आहेत ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’
४५ वर्षीय साक्षी तन्वर अद्याप अविवाहित आहे. २०१५ मध्ये तिने एका व्यावसायिकाशी गुपचूप लग्न केल्याची जोरदार चर्चा होती. पण या चर्चा केवळ अफवा असल्याचं तिने नंतर स्पष्ट केलं होतं.