विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘गर्ल्स’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या चित्रपटाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटाचे हे पोस्टर पाहून संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी चांगलेच संतापले आहेत. फेसबुकवर पोस्ट लिहित त्यांनी या पोस्टरचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

‘बॉईज’ आणि ‘बॉईज २’ या चित्रपटांनंतर दिग्दर्शक विशाल देवरुखकर मुलींच्या अनोख्या विश्वाची सफर घडवण्यासाठी ‘गर्ल्स’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. या चित्रपटाच्या नवीन पोस्टरमध्ये नवोदित अभिनेत्री अंकिता लांडे पाहायला मिळत आहे. ‘गर्ल्स’ या अभिजात चित्रपटातील ही सुसंस्कृत व्यक्ती FamilySucks आणि आयुष्यावर बोलू काही, असं लिहिलेला टी-शर्ट घालून असभ्य हालचाली करते हे अजिबात योग्य नाही, असं सलील यांनी म्हटलं आहे. ‘आयुष्यावर बोलू काही’ हे सलील कुलकर्णींच्या लोकप्रिय कार्यक्रमाचं नाव आहे.

आणखी वाचा : वयाची सत्तरी ओल्यांडल्यानंतरही कामाचा अट्टहास का?; बिग बी म्हणतात..

याविषयी त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं, ”नाती, आई-बाबा, घर या हळव्या विषयांना हात घालणारा आमचा आणि तुमचा लाडका कार्यक्रम मराठी कविता आणि गाण्यांचा- आयुष्यावर बोलू काही. आपल्या या कार्यक्रमाबद्दल हा आदर? गेली सोळा वर्षे हाऊसफुल गर्दीत चालू असलेल्या कार्यक्रमाचा असा अपमान? काय विचार असेल यात? मी, संदीप खरे, आदित्य आठल्ये, रितेश ओहोळ आणि मित्रमंडळी असे आम्ही सर्वजण याचा तीव्र निषेध करतो.”

‘गर्ल्स’ हा चित्रपट येत्या २९ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादात सापडला आहे.