विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनचा आज ४४ वा वाढदिवस. आज ऐश्वर्याशी निगडीत अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्या खासगी तसेच व्यावसायिक गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी सारेच उत्सुक असतात. आज आम्हीही तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहोत जी ऐकून तुम्हाला नक्कीच नवल वाटेल.

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे ‘पद्मावती’ सिनेमाच्या संहितेवर कित्येत वर्षांपासून काम करत होते. त्यांच्या ‘रामलीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमाच्याआधीपासून भन्साळींच्या डोक्यात ‘पद्मावती’ची संहिता घोळत होती. पण भन्साळी यांना जी योग्य जोडी हवी होती ती मिळत नसल्यामुळेच त्यांनी या सिनेमाचे काम सुरू केले नव्हते.

राणी पद्मावती सिनेमाच्या अभिनेत्रीसाठी भन्साळी यांची पहिली पसंती ही दीपिका नसून ऐश्वर्या होती. आज जरी पद्मावतीच्या भूमिकेत आपण दीपिकाला पाहत असलो, तरी ऐश्वर्याने या सिनेमासाठी होकार दिला असता तर आज दीपिकाऐवजी ऐश्वर्या घुमर डान्स करताना दिसली असती.
भन्साळी यांना सलमान खान आणि ऐश्वर्या यांना घेऊन पुन्हा एकदा बिग बजेट सिनेमा करायचा होता. यासाठी त्यांनी ऐश्वर्याशी बोलणीही केली होती. ऐश्वर्याने सिनेमाची संहिता ऐकून सिनेमासाठी होकारही दिला होता. पण सिनेमात काम करण्यासाठी तिने भन्साळीसमोर एक अट ठेवली होती.

रिपोर्टनुसार, भन्साळी यांनी अल्लाउद्दीन खिलजीची व्यक्तिरेखा सलमानला द्यावी अशी ती अट होती. ऐश्वर्याच्या या अटीमुळे भन्साळींचे सलमान-ऐश्वर्याला घेऊन सिनेमा करण्याचे स्वप्न शेवटी स्वप्नच राहिले. या सिनेमात पद्मावती आणि खिलजी यांचे कोणतेच सीन एकत्र नाहीयेत. त्यामुळे सलमान आणि ती एकाच सिनेमात हवे असल्यास सलमानला खिलजीचीच भूमिका द्यावी अशी अट तिने घतली होती. पण सलमानला ऐश्वर्याची अट कळली तेव्हा त्याने भन्साळींना स्पष्ट नकार कळवला.

लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘पद्मावती’ सिनेमात दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमात रणवीर अल्लाउद्दीन खिलजीची व्यक्तिरेखा साकारत आहे तर महारावल रतन सिंहच्या भूमिकेत शाहिद कपूर दिसणार आहे. येत्या १ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.