अभिनेता सलमान खान आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी अखेर २० वर्षांनंतर एकत्र काम करणार आहेत. सलमानच्या या चित्रपटाची अधिकृत घोषणा झाली असून यामध्ये त्याच्यासोबत आलिया भट्ट झळकणार आहे. ‘ईन्शाल्ला’ असं चित्रपटाचं नाव असून सलमान आणि आलियाने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर याविषयीची माहिती दिली आहे.

भन्साळींच्या या चित्रपटात आधी सलमानसोबत शाहरुख खानच्या नावाचीही चर्चा होती. त्याचप्रमाणे भन्साळी अभिनेत्री दीपिका पदुकोणसाठी आग्रही असल्याचंही म्हटलं जात होतं. पण अखेर सलमान आणि आलियाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

वाचा : अक्षय कुमार कसा ठरतो सर्वाधिक करदाता? रितेश देशमुख सांगतोय गुपित 

‘२० वर्षांनंतर अखेर मी आणि संजय परततोय. आलियासोबत काम करण्यास उत्सुक आहे,’ असं सलमानने ट्विट केलं. तर आलियानेही ट्विट करत तिचा आनंद व्यक्त केला. ‘मी नऊ वर्षांची असताना पहिल्यांदा संजय लीला भन्साळींच्या ऑफीसमध्ये गेले होते. तेव्हापासून त्यांच्या चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहा असं म्हणतात आणि मी तेच केलं. संजय सर आणि सलमान खान ही जो़डी अप्रतिम आहे आणि त्यांच्यासोबत काम करण्यात मी खूप उत्सुक आहे,’ असं ती म्हणाली.

हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे.