पतीचा मृत्यू झाला असला तरी त्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी एका पत्नीने कंबर कसली आहे. ती पत्नी म्हणजे दिवंगत अभिनेता इंदर कुमारची पत्नी पल्लवी कुमार. ४४ वर्षीय इंदर कुमारचा २७ जुलैला हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता. त्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे जेवढे बॉलिवूड हळहळले होते तेवढेच त्याचे चाहतेही हळहळले होते. माणूस गेल्यावर त्याच्या भूतकाळापासून ते वर्तमान आणि भविष्यापर्यंत साऱ्याचीच चर्चा होते. याला इंदर कुमार तरी कसा अपवाद ठरले.

अभिषेकसोबत लग्न केल्याचा दावा करणारी ‘ती’ येणार ‘बिग बॉस ११’ मध्ये?

इंदर कुमारच्या नैराश्याचे कारण काम न मिळणं आणि त्यामुळे आलेली आर्थिक अडचण हे होतेच शिवाय त्याच्यावर असलेला बलात्काराचा आरोप हेही नैराश्याचं मुख्य कारण होते, असे पल्लवीचे म्हणणे आहे. २०१४ मध्ये २५ वर्षीय एका मॉडेलने बॉलिवूडमध्ये संधी देण्याच्या आमिषाने इंदर कुमारने बलात्कार केल्याचा आणि तीन दिवस मारहाण केल्याचा आरोप केला होता. ‘स्पॉटबॉयईज’ला दिलेल्या मुलाखतीत पल्लवी म्हणाली की, ‘इतर अनेक कारणांसोबतच त्याच्यावर झालेला बलात्काराचा आरोप त्याला सतत सलत राहायचा. अशा गंभीर आरोपासाठी जर तुम्हाला तुरुंगात जावं लागलं तर त्याचा ताण साहजिकच येणार. त्यातही जर तुम्ही कलाकार असता तेव्हा सगळ्यांच्या नजरा तुमच्यावरच खिळलेल्या असतात. सुनावणीवेळी जाताना त्याला फार त्रास व्हायचा.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेव्हा बलात्कार खटल्यातील दोषीचा मृत्यू होतो, तेव्हा ते प्रकरण निकालात निघते. इंदर कुमारच्या बाबतची असेच घडले. इंदरच्या मृत्यूनंतर हा खटला बंद होणार होता. मात्र आता पल्लवीनेच न्यायालयात हा खटला सुरू ठेवण्याची विनंती केली आहे. ‘इंदर निर्दोष असल्याची मला खात्री आहे. त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी आणि त्याच्या प्रसिद्धीचा गैरवापर करण्यासाठी खोटे आरोप लावले गेले आहेत. त्याला न्याय मिळायला हवा म्हणून मी न्यायालयात याचिका दाखल करुन खटला सुरू ठेवण्यास सांगितले. आमच्या बाजूनेच निकाल लागेल याची मला खात्री आहे. शिवाय खोटे आरोप करणाऱ्या त्या मॉडेललाही योग्य ती शिक्षा झाली पाहिजे,’ असे पल्लवीचे म्हणणे आहे.