बॉलीवूड अभिनेता सलमान खान हा त्याच्या सवयीप्रमाणे काहीनाकाही उचापती करून वादाच्या भोव-यात सापडत असतो. मात्र, यावेळी त्याने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यातून त्याची सुटका होणे कठीणच आहे.
स्पॉटबॉय वेबपोर्टलला दिलेल्या विशेष मुलाखतीत सलमानने स्वतःची तुलना बलात्कारीत महिलेशी केलीय. आगामी सुलतान चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर सलमानची मुलाखत घेण्यात आली होती. त्यावेळी तो चित्रपटातील त्याच्या अनुभवाविषयी सांगत होता. तेव्हा सलमान म्हणाला की, शूटींगच्या त्या सहा तासांमध्ये बरीच मेहनत घ्यावी लागत होती. जर एखादा पहेलवान मला उचलून जमिनीवर आदळतोय तर मलाही १२० किलो वजनाच्या पहेलवानाला उचलून आपटावे लागत होते. जवळपास दहा वेळा दहा विविध बाजूंनी एकाचा दृश्याचा अॅन्गल घेतला जाई. माझ्यासाठी हे फार कठीण काम होते. जेव्हा मी शूटींग आटपून रिंगणातून बाहेर यायचो तेव्हा मला बलात्कार झालेल्या महिलेप्रमाणे वाटायचे. मला सरळ चालताच यायचे नाही. त्यानंतर मी जेवून पुन्हा लगेच ट्रेनिंगला जायचो आणि असेच चक्र संपूर्ण शूटींग चालू होते.
चित्रपटावर इतकं काम केल्यानंतर अनेक मुलाखती देण्याने एखाद्यावर ताण येणं स्वाभाविक आहे. पण आपण समाजातील नामवंत व्यक्ती असल्यावर आपण काय बोलतोय याचे भान ठेवणेही तितकेच गरजेचे असते. बहुदा सलमानला याची जाणीव करून देण्याची गरज आहे. सलमानच्या या वक्तव्यावर नेटिझन्सनी आपला राग व्यक्त केला आहे. त्यात एका मुलीने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलेयं की, बलात्कार झालेल्या महिलेस काय वाटत याची सलमानला काय माहिती, आणि अशा व्यक्तीला लोक आंधळेपणाने पाठिंबा देतात.