गेल्या काही दिवसांत चित्रपटसृष्टीतील लैंगिक शोषण, कास्टिंग काऊच या विषयांवर बरीच चर्चा झाली. अनेकांनी त्यावर आपापली मते मांडली. दिल्लीतील एका कार्यक्रमात बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमानने कास्टिंग काऊचबद्दल त्याचे मत मांडले.

‘इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचबद्दल कोणीच उघडपणे बोलत नाही. या क्षेत्रात मी बऱ्याच वर्षांपासून आहे. या क्षेत्राचा माझ्या वडिलांना माझ्याहूनही अधिक अनुभव आहे. तुम्ही सुंदर दिसत असाल तर एखाद्याने तुमच्यासोबत फ्लर्ट करणे साहजिक आहे. पण याला शोषण म्हणता येणार नाही,’ असे तो म्हणाला.

यासंदर्भात तो पुढे म्हणाला की, ‘काम मिळवण्यासाठी तुम्हाला एखादा व्यक्ती तडजोड करण्यास सांगत असल्यास, हे अत्यंत वाईट आहे. पण असे काही घडल्याचे मी आतापर्यंत ऐकले नाही. कास्टिंग काऊचची तक्रार जर एखाद्या महिलेने किंवा पुरुषाने माझ्याकडे येऊन केली तर मी दोषींना नक्कीच धडा शिकवेन.’

PHOTOS : लग्नबंधनात अडकली ही टेलिव्हिजन अभिनेत्री

या कार्यक्रमात त्याला बॉलिवूडमधील घराणेशाहीवरही प्रश्न विचारला गेला. यावर घराणेशाही म्हणजे काय ही संकल्पनाच मला यापूर्वी माहित नव्हती. अभिनेत्री कंगना रणौतमुळेच मला घराणेशाही म्हणजे काय हे समजले असे त्याने सांगितले.

वाचा : ‘ये है मोहब्बते’मधून दिव्यांकाची एक्झिट?

सलमान खान आणि कतरिना कैफचा आगामी चित्रपट ‘टायगर जिंदा है’ २२ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिल्लीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.