वाद ही सलमान खानसाठी नवीन गोष्ट नसल्याचे विधान अभिनेत्री कतरिना कैफने केले आहे. ‘बार बार देखो’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ती बोलत होती. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाच्या अॅम्बेसेडरपदी सलमानची नियुक्ती झाल्यामुळे निर्माण झालेल्या वादाविषयी यावेळी कतरिनाला विचारण्यात आले. त्यावेळी वाद ही सलमानसाठी काही नवी गोष्ट नसल्याचे कतरिनाने म्हटले. मात्र, तिने रिओ ऑलिम्पिकविषयी मतप्रदर्शन करण्याचे टाळले.
रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी भारतीय पथकाच्या सदिच्छादूतपदी बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या नियुक्तीवरून वाद निर्माण झाला होता. कुस्तीपटू योगेश्वर दत्त तसेच ज्येष्ठ धावपटू मिल्खा सिंग यांनी सलमानच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. मात्र, अव्वल नेमबाजपटू अभिनव बिंद्रासह काही क्रीडापटूंनी सलमानच्या नियुक्तीचे स्वागत केले होते.

Story img Loader