टीव्हीवरील बहुचर्चित रिअॅलिटी शो म्हणून बिग बॉसचे नाव घेतले जाते. लवकरच या शोचा ११ वा सिझन प्रदर्शित होणार आहे. या सिझनचा एक टिझरही प्रदर्शित करण्यात आला होता. या टिझरमध्ये सलमान त्याच्या शेजाऱ्यांसोबत गप्पा मारताना दिसतो. पण हा टिझर नेमका कसा चित्रीत करण्यात आला असेल हे मात्र सलमानच्या चाहत्यांना माहित नाही. याचेच उत्तर आता ‘कलर्स’ वाहिनीने दिले आहे. ‘कलर्स’ने नुकताच या चित्रीकरणाचा मेकिंग व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या सिझनची थीम ‘पडोसी’ अशी आहे. ‘इंडिया टुडे डॉट कॉम’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार टिझरचे चित्रीकरण करताना सलमान अनेकदा त्याच्या शेजारी राहणाऱ्या लोकांबाबतही चर्चा करत होता. या चित्रीकरणावेळी त्याने स्वतः त्याच्या आयुष्याशी निगडीत गोष्टी व्हिडिओमध्ये समाविष्ट करण्याचा सल्ला दिला. यामुळेच त्याच्या लग्नाचा विषय या टिझरमध्ये घेण्यात आला.

सलमान खान कधी लग्न करणार हा तर जणू राष्ट्रीय प्रश्नच झाला आहे. सर्वसामान्यांना रोजच्या जीवनात भाजीपाल्यांच्या दरवाढीची जेवढी चिंता असते तेवढीच चिंता सलमानच्या चाहत्यांना, तो कधी लग्न करणार याची असते. त्याच्या लग्नाशी निगडीत येणाऱ्या बातम्यांमुळे त्याचे चाहते थोडे सुखावतात. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन ‘बिग बॉस’ने त्याच्या ११ व्या सिझनचा भन्नाट टिझर प्रदर्शित केला आहे. या ४५ सेकंदाच्या टिझरमध्ये सलमानची शेजारीण त्याला लग्न कर म्हणजे घरची कामं करायला मदत होईल असा सल्ला देते. पण सलमान तिच्यासोबतच फ्लर्ट करायला सुरूवात करतो जे ऐकून ती सलमानलाच बेशरम बोलते.

‘बिग बॉस’च्या प्रत्येक सिझनची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असते. येत्या सिझनमध्ये कोण असणार? चांगले कलाकार या सिझनमध्ये दिसतील का? कोणत्या कलाकाराने टास्क जिंकला? कोणामध्ये भांडणं झाली? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी ते प्रत्येक सिझन आवर्जून पाहतात.

‘बिग बॉस’च्या अकराव्या सिझनची रसिकांमध्ये असलेली उत्सुकता शिगेला पोहचली असताना ‘बिग बॉस’च्या अकराव्या सिझनचा प्रोमो समोर आला आहे. ‘बिग बॉस’चे मागील काही सिझन इतर सिझनच्या तुलनेत कमी लोकप्रिय झाले होते. म्हणूनच की काय आता गेलेली लोकप्रियता परत मिळवण्यासाठी नवनवीन फंडे बिग बॉसची टीम वापरताना दिसते. यंदा या शोची रचना काहीशी वेगळी आहे. ‘बिग बॉस’च्या घरात यंदा शेजारी- शेजारी असा अनोखा खेळ रंगणार असल्याचे दिसते.

मुलीमुळे रणदीप सुश्मिताच्या प्रेमात, ब्रेकअपनंतर बदलले आयुष्य

या घरात निया शर्मापासून ते सना सईदपर्यंत अनेक नावाजलेले सिनेकलाकार तसेच टिव्ही कलाकार दिसण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ‘सेलिब्रिटी’ आणि ‘कॉमन’ जनतेमधील निवडक व्यक्ती एकत्र असणार आहेत. मात्र या सिझनमध्ये ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश मिळणाऱ्या सर्वसामान्य स्पर्धकांना कोणतेही मानधन मिळणार नाही.