काळवीट शिकार प्रकरणातून न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खानने पुन्हा एकदा त्याचा मोर्चा आगामी चित्रपटांकडे वळवला आहे. सध्याच्या घडीला तो आगामी रेस ३ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला प्राधान्य देत असून, या चित्रपटाच्या पुढील चित्रीकरणासाठी त्याने पृथ्वीवरील स्वर्ग समजल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीर राज्याला भेट दिली. यावेळी त्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतल्याचे पाहायला मिळाले. जोधपूर न्यायालयाने सलमानचा जामीन अर्ज मंजूर केल्यानंतर तो कारागृहातून बाहे आला खरा. पण, तरीही परदेशात जाऊन चित्रीकरण करण्याची त्याला परवानगी नसल्यामुळे रेस ३ च्या निर्मात्यांनी देशातच काही ठिकाणांची निवड करत या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यासाठी काही महत्त्वाची पावलं उचलल्याचे पाहायला मिळाले.
आगामी रेस ३ च्या चित्रीकरणासाठी सलमान आणि त्याच्या टीमने सोमवारी जम्मू-काश्मीर राज्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान सलमानने जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मेहबुबा मुफ्ती आणि सलमान यांची जवळपास एक तास चर्चा झाली. या भेटीची छायाचित्रेही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रेस ३ या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूझा करत असून, रमेश तौरानी आणि सलमान खानने या चित्रपटाची निर्मितीची धुरा उचलली आहे.
मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी सलमान आणि त्याच्या टीमचे काश्मीरमध्ये स्वागत केल्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी तौरानी यांनी ट्वीट करत मुफ्ती यांचे आभार मानले. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या आगामी चित्रपटामध्ये अनिल कपूर, बॉबी देओल, जॅकलिन फर्नांडीस, डेजी शहा आणि साकिब सलीम हे कलाकारही झळकणार आहेत.