बॉलिवूडचा भाईजान सलामान खानचा ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. आता या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या नव्या पोस्टरमध्ये सलमान खानसोबत मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे देखील दिसत आहेत.

सलमानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत त्याने ‘लवकरच येत आहे… तुमचा मोस्ट वाँटेड भाई’ असे कॅप्शन दिले आहे. पोस्टरवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील देण्यात आली आहे. हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा : अजय देवगणचे डिजिटल विश्वात पदार्पण, ‘रुद्र द ऐज ऑफ डार्कनेस’मधील लूक प्रदर्शित

सध्या सोशल मीडियावर सलमान खानच्या ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटाचे पोस्टर चर्चेत आहे. पोस्टरमध्ये प्रवीण तरडे यांना पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र ते चित्रपटात कोणत्या भूमिकेत दिसणार हे स्पष्ट झालेलं नाही.

‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटाची निर्मिती प्रभु देवाने केली आहे. या चित्रपटात सलमान एकदम वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणी २०१९मध्ये करण्यात आली होती. २०२०मध्ये ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता अखेर हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.

‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटात सलमान खान राधे हे पात्र साकारणार आहे. तसेच रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफ, दिशा पटाणी, प्रवीण तरडे आणि इतर काही कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समोर आले आहे. जगभरात हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader