बॉलिवूडचे ‘खान’दान अर्थात सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांना एकत्र पाहायला कोणाला आवडणार नाही. या तिघांनी मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणं म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच ठरेल. मात्र आम्ही तिघी कधीच एकत्र काम करू शकणार नाही, असं वक्तव्य सलमानने केलं आहे. ‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत त्याने यामागचं कारणसुद्धा सांगितलं आहे.

“आम्ही तिघंही एकत्र काम करायचं म्हणजे त्या चित्रपटाचा बजेट खूपच जास्त ठेवावा लागेल. आपल्याला कमीत कमी २० हजार थिएटर चित्रपटाच्या वितरणासाठी लागतील. सध्या आपल्याला फक्त पाच ते सहा हजार स्क्रीन्स मिळतात. अशा मोठ्या चित्रपटासाठी तेवढे स्क्रीन्स लागतील. जे आताच्या परिस्थितीत शक्य नाही. त्यामुळे आम्ही एकत्र काम करु शकणार नाही”, असं सलमान म्हणाला.

आणखी वाचा : भारतीय आहेस का विचारणाऱ्याला तापसीचं सडेतोड उत्तर 

सलमानने शाहरुख आणि आमिर दोघांसोबत काम केलं आहे. पण शाहरुख आणि आमिर फक्त पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत एकत्र झळकले. शाहरुखने सध्या वर्षभर ब्रेक घेतला आहे. ‘झिरो’नंतर त्याचा चित्रपट प्रदर्शित झालाच नाही. हा चित्रपटसुद्धा बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला. आमिर खानचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपटसुद्धा अपयशी ठरला. सलमान खानच्या ‘दबंग ३’ने चांगली कमाई केली. सध्या हे तिघेही आपापल्या चित्रपटात व्यग्र आहेत. आमिरचा ‘लाल कप्तान’, शाहरुखचा ‘सॅल्यूट’ आणि सलमानचा ‘राधे’ हे चित्रपट येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.