आपल्या कुटुंबाला नेहमी प्राधान्य देणाऱ्या अभिनेता सलमान खानचं बहिण अर्पितावर किती प्रेम आहे, हे काही वेगळं सांगायला नको. ‘दबंग’ खानला आपल्या बहिणभावांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिल्याचं, त्यांच्या मदतीला धावून गेल्याचं आपण नेहमीच पाहिलंय. आतापर्यंत या ‘भाईजान’चे कुटुंबियांसोबतचे अनेक फोटो, व्हिडिओही तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. नुकताच त्याने अर्पितासोबतचा एक जुना किस्सा सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

युकेमधील एका कार्यक्रमाचा व्हिडिओ त्याने ट्विटरवर पोस्ट केलाय. आपल्या लहान मुलाला सलमान खान नीट पाहता यावा यासाठी एका व्यक्तीने आपल्या लहानग्याला स्वत:च्या खांद्यांवर उचलून घेतल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय. हे दृष्य पाहून १९९६ मध्ये मायकल जॅक्सनच्या कॉन्सर्टमध्ये आपण अर्पितालाही असंच उचलून घेतल्याचं सलमानला आठवलं. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं की, ‘हे पाहून मला १९९६ च्या मायकल जॅक्सनच्या कॉन्सर्टची आठवण झाली. कॉन्सर्ट संपेपर्यंत मी अर्पिताला माझ्या खांद्यावर उचलून घेतलं होतं.’

आगामी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर युकेमध्ये सलमानचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जॅकलिन फर्नांडिस, बादशहा, सूरज पांचोली, सोनाक्षी सिन्हा आणि इतर काही कलाकारदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. याचं आयोजन ‘सोहेल खान एन्टरटेन्मेंट’ आणि ‘जेए इव्हेंट्स’तर्फे करण्यात आलं होतं.

वाचा : ना शाहरुख, ना सलमान; स्मृती मंधानाला ‘या’ बॉलिवूड स्टारला डेट करायचंय!

अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा हा सिक्वल असून अभिनेत्री कतरिना कैफसुद्धा मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय आनंद एल राय दिग्दर्शित शाहरुखच्या एका चित्रपटात तो पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे.