सध्या गाण्यांच्या रिक्रिएट व्हर्जनचा ट्रेण्ड आहे. नव्या चित्रपटांमध्ये गाजलेल्या जुन्या गाण्यांचे रिमेक सर्रास पाहायला मिळतात. असंच आणखी एका प्रसिद्ध जुन्या गाण्याचं रिक्रिएट व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खानचं सर्वाधिक गाजलेलं गाणं ‘ओss ओss जाने जाना’ नव्या रुपात पाहायला मिळणार असून कतरिना कैफची बहिण इसाबेल कैफच्या चित्रपटात ते रिक्रिएट केलं जाणार आहे.

दिग्दर्शक रेमो डिसूझाच्या चित्रपटातून इसाबेल बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. यामध्ये ती सूरज पांचोलीसोबत भूमिका साकारणार आहे. ‘टाइम टू डान्स’ असं नाव असलेल्या या चित्रपटात ओss ओss जाने जाना’चं रिक्रिएटेड व्हर्जन पाहायला मिळणार आहे. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटातील कमाल खानच्या आवाजातील हे गाणं जतिन- ललित या जोडीने संगीतबद्ध केलं होतं. तर नवीन व्हर्जनसुद्धा कमाल खानच गाणार असून शिवाय व्यास त्याचं संगीत दिग्दर्शन करणार आहे. विशेष म्हणजे या गाण्यात सलमानसोबतच सूरज आणि इसाबेलसुद्धा झळकणार आहेत.

वाचा : मराठी ‘बिग बॉस’विषयी उषा नाडकर्णींचा खुलासा

इसाबेलचा हा पहिला हिंदी चित्रपट असल्यानं या चित्रपटासाठी तिही खूप उत्सुक आहे. लंडनमध्ये या चित्रपटाचा काही भाग चित्रीत करण्यात येणार आहे. इसाबेल या चित्रपटासाठी विशेष मेहनत घेत आहे. ती यात बॉलरुम डान्सरची भूमिका साकारणार आहे. इसाबेलच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी कतरिनाही खूप उत्सुक आहे.