बॉलिवूडमधील खान अभिनेत्यांनी प्रत्येक सण जणू काही त्यांच्या चित्रपटांसाठी वाटूनच घेतल्याचे दिसते. आमिर खान त्याचे बहुतेक चित्रपट ख्रिसमस दरम्यान प्रदर्शित करतो तर शाहरुखचे चित्रपट दिवाळीत येतात. तर ‘दबंग’ फेम अभिनेता सलमान खानचे चित्रपट ईदच्यावेळी प्रदर्शित होतात. चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी हे दिवस सुफळ ठरत असल्याची या अभिनेत्यांची धारणा आहे. मात्र, ईदच्या मुहूर्तावरच प्रदर्शित झालेला सलमानचा शेवटचा चित्रपट ‘ट्युबलाइट’ हा बॉक्स ऑफिसवर फार काही चांगली कमाई करु शकला नाही. चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकांकडून ‘ट्युबलाइट’ला चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. असे असतानाही, २०१९ मध्ये येणाऱ्या ईदच्या दिवशी सलमानने त्याचा आगामी चित्रपट प्रदर्शित करण्याचे ठरवलेय. अली अब्बास जफर दिग्दर्शित आणि अतुल अग्निहोत्रीची निर्मिती असलेला ‘भारत’ ईदला प्रदर्शित होईल. याआधी सलमानने अतुलसोबत ‘बॉडीगार्ड’ आणि अलीसोबत ‘सुलतान’ या हिट चित्रपटांमध्ये काम केलेय. हे त्रिकूट आता एकत्र येत असून रुपेरी पडद्यावर त्यांची कमाल दाखवण्यात यशस्वी होणार का? ते पाहावे लागेल.

वाचा : मी केवळ शारीरिक गरजेसाठी तिचा वापर केला- नवाजुद्दीन

‘ओड टू माय फादर’ या २०१४ साली प्रदर्शित झालेल्या कोरियन चित्रपटावर सलमानचा ‘भारत’ आधारित आहे. १९५० पासून ते आतापर्यंतच्या आधुनिक कोरियन संस्कृतीची झलक या चित्रपटात दाखवण्यात आली होती. तसेच, एका सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून काही ऐतिहासिक घटनांवर प्रकाश टाकण्यात आलेला. तर ‘भारत’ चित्रपटात १९४७ पासून ते २००० पर्यंतच्या काळात घडलेल्या घटनांवर भाष्य करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

वाचा : जाणून घ्या, हेमा मालिनी यांच्या नातीचे नाव…

अतुल चित्रपटाविषयी म्हणाला की, ‘भारत’ हा एका देशाचा आणि हेच नाव असलेल्या व्यक्तीचा प्रवास आहे. रिमेकसाठी आम्ही कोरियन चित्रपटाचे अधिकृत अधिकार विकत घेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहोत. जेणेकरून, चित्रपटाच्या प्रदर्शनात कोणताही अडथळा येऊ नये.
दरम्यान, येत्या डिसेंबरमध्ये सलमान त्याच्या चाहत्यांसाठी ‘टायगर जिंदा है’ चित्रपट घेऊन येतोय. यात सलमानसह कतरिना कैफ हिची भूमिका असून, याचेही दिग्दर्शन अली अब्बास जफर यानेच केले आहे.