क्रिकेट आणि भारत हे एक धम्माल समीकरण आहे. क्रिकेट या खेळाची पाळेमुळे जरी इंग्रजांकडील असली तरीही भारतामध्ये या खेळाबद्दल अपार आपुलकी आणि प्रेम पाहायला मिळते. भारतीय क्रिकेट संघाने १९८३ रोजी कपिल देव यांच्या नेतृत्त्वामध्ये पहिलावहिला क्रिकेट विश्वचषक मायदेशी आणला होता. १९८३ च्या त्या ऐतिहासिक दिवसाचा थरार एका चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा जागवण्यात येणार आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून सलमान खाची बहिण अलविरा खान आणि तिचा पती अतुल अग्निहोत्री या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार या चित्रपटासाठी माजी क्रिकेटपटू कपिल देव आणि त्या वेळच्या भारतीय संघातील काही दिग्गज खेळाडू त्यांचे योगदान देणार आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये खेळाडू आणि त्यांच्या जीवनावर बनणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळते. याआधीही ‘मेरी कोम’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘अझर’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. नुकताच प्रदर्शित झालेल्या भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित ‘एम. एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटालाही प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. १९८३ चा क्रिकेट विश्वचषक भारतीयांच्या आणि क्रिकेटप्रेमींच्या मनाचा अगदी जवळचा विषय आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत सध्या औत्सुक्याचे वातावरण पाहायला मिळत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाच्या चित्रिकरणाचे काम पूर्ण होताच कबीर खान या चित्रपटावर काम करणार आहे. त्यामुळे येत्या काळात हा चित्रपट क्रिकेटप्रेमी आणि चित्रपटप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणार आहे यात शंकाच नाही.