दाक्षिण्यात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनीचे केवळ साउथमध्येच नव्हे तर देशभरात चाहते आहेत. दाक्षिण्यात्य सिनेमामध्ये संथनाने लोकप्रिय कलाकारांच्या यादीत आपलं स्थान निर्माण केलंय. तर ‘फॅमिली मॅन-२’ मध्ये राजीची भूमिका साकारत तिने देशवासियांची पसंती मिळवली आहे. सोशल मीडियावर समंथा चांगलीच सक्रिय आहे. मात्र सध्या समंथा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. समंथाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सासरचं आडनाव काढून टाकलं आहे.

समंथाने तेलगू अभिनेता नागा चैतन्यशी लग्न केल्यानंतर अक्किनेनी हे आडनाव लावण्यास सुरुवात केली होती. मात्र समंथाने आता तिचं हे आडनाव सोशल मीडियावरून हटवलं आहे. समंथाने इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर असलेल्या डिस्प्ले नावातून अक्किनेनी नाव हटवत आता केवळ ‘S’ (एस) हे अक्षर ठेवलंय. असं असलं तरी तिच्या फेसबुक पेजवर समंथा अककिनेनी हे संपूर्ण नाव आहे.

हे देखील वाचा: कियारा आडवाणीचं खरं नाव माहितेय का?; ‘या’ अभिनेत्याच्या सांगण्यावरून बदलंलं नाव

समंथाने कोणतही कारण न देता किंवा पोस्ट शेअर न करता शुक्रवारी सोशल मीडियावरील नावात बदल केल्याने आता चाहत्यांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत. अनेकांनी समंथा आणि नागा चैतन्यमध्ये काही बिनसलं असल्याचा अंदाज लावला आहे. नाव बदलण्याचं खरं कारण समंथालाच ठाऊक असलं तरी आता नेटकऱ्यांमध्ये मात्र समंथा आणि नागा चैतन्यच्या नात्यावरून चर्चांना उधाण आलंय.

samantha-social-media-account
(Photo-Instagram/twitter-samantha)

हे देखील वाचा: “पार्टीसाठी सगळे एकत्र येतात मग आता…” शिल्पा शेट्टीला पाठिंबा देत दिग्दर्शकाने सेलिब्रिटींना सुनावलं

२०१० सालात समंथा आणि नागा चैतन्यने ‘ये माया चेसवे या सिनेमात एकत्र काम केलं होतं. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर समंथा आणि नागा चैतन्यने २०१७ सालामध्ये गोव्यात लग्न केलं.

सध्या समंथा पौराणिक कथेवर आधारित ‘शाकुंतलम’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यासोबतच ती विजय सेतुपति आणि नयनतारासोबत ‘काथू वाकुला रेंडू काधल’ या सिनेमात प्रमुख भूमिकेत झळकणीर आहे.