दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा म्हणजेच अभिनेता नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभूच्या लग्नाची तयारी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. ऑक्टोबरमध्ये हे दोघं विवाहबद्ध होणार आहेत. ‘ये माया चेसावे’ या तेलुगू चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम फुललं. चाहत्यांमध्ये या दोघांच्या प्रेमकहाणीविषयी उत्सुकता असतानाच नागा चैतन्यने नुकत्याच एका मुलाखतीत समंथाविषयी बऱ्याच गोष्टी सांगितल्या.

‘२००९ मध्ये ‘ये माया चेसावे’ चित्रपटासाठी काम करताना आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. माझ्या घरी या नात्याबद्दल सांगण्यासाठी मी धजावत नव्हतो. बऱ्याचदा तिने यासाठी आग्रह केला होता. एके दिवशी चॅट करत असताना सहज हा विषय निघाला. जर मी घरी आमच्या नात्याबद्दल सांगितलं नाही तर मी तुला राखी बांधेन अशी धमकीच तिने मला दिली (हसतो). हे ऐकून मी दचकलो, आणि लगेच माझ्या घरी आमच्याबद्दल सांगितलं,’ असं तो म्हणाला.

https://www.instagram.com/p/BQscKVDA7yg/

https://www.instagram.com/p/BP60Wpsj9z8/

नागा आणि समंथाचा जानेवारीमध्ये मोठ्या थाटामाटात साखरपुडा झाला होता. फक्त जवळच्या कुटुंबीयांसाठी असलेला हा सोहळा कोणत्याही लग्न सोहळ्यापेक्षा कमी नव्हता. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची पत्रिका लिक झाली होती. नागा चैतन्य आणि समंथा यांच्या लग्नासाठी गोव्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये सर्व व्यवस्था करण्यात आली असून आता सर्वांनाच या दिमाखदार सोहळ्याची प्रतिक्षा लागून राहिली आहे.