देशात आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. करोनाच्या विषाणूत झालेल्या बदलांमुळे करोनाचा प्रादूर्भाव वेगाने वाढतोय. अशात अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. ८ मे रोजी अभिनेत्री संभावना सेठच्या वडिलांचे कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन झाले. यापूर्वी त्यांची करोना चाचणी ही पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले होते. आता संभावनाने शनिवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिने वडिलांच्या ‘मेडिकल हत्ये’साठी रुग्णालयाला दोषी ठरवले आहे. संभावनाच्या वडिलांना एप्रिल ते मे दरम्यान करोनावरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते.

संभावनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रुग्णालयात कशा प्रकारे वागणूक दिली जाते या बद्दल संभावना सांगताना दिसते. “त्यांनी माझ्या वडिलांना मारले. ज्या प्रकारे लोक बोलतात की हे जग ब्लॅक अॅंड व्हाईट नसतं. त्याचप्रमाणे, प्रत्येक डॉक्टर ईश्वर समान असू शकत नाही. असेही काही वाईट लोक आहेत ज्यांनी पांढरा कोट घातला आहे आणि त्यांनी आपल्या प्रियजनांचा जीव घेतला आहे,” असे संभावना म्हणाली.

दरम्यान, वडिलांच्या निधनाची बातमी संभावनाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत दिली होती. ती म्हणाली, “आज संध्याकाळी ५ वाजून ३७ मिनिटांनी संभावनाने तिच्या वडिलांना गमावलं. हृदय विकाराचा झटका आल्याने वडिलांचं निधन झालं.कृपया तुमच्या प्रार्थनेत त्यांना स्थान द्या.” अशी पोस्ट शेअर केलीय. संभावनाचे पती अविनाथ यांनी ही पोस्ट शेअर केलीय.

आणखी वाचा : त्या दिवसानंतर अनिल कपूरसोबत पुन्हा काम न करण्याचा निर्णय माधूरीने घेतला होता

संभावनाच्या वडिलांना करोनाची लागण झाल्यानंतर त्याना दिल्लीमध्ये बेड उपलब्ध होत नव्हता. सोशल मीडियावरून संभावनाने मदत मागितली होती. त्यानंतर दिल्लीतील जयपूर गोल्डन रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. मात्र करोनाची दोन हात करत असताना त्यांचं निधन झालं.