महाराष्ट्रात ६ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १५९ वर गेली आहे. संपूर्ण देशात लॉकडाउन असल्याने घराबाहेर न पडण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. सध्याची परिस्थिती ही अत्यंत निराशाजनक असून लहान मुलांना याविषयी कसं समजवायचं हा प्रश्न अभिनेत्री समीरा रेड्डीला पडला आहे. समीराने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत तिच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. देशातील सध्याच्या परिस्थितीबाबत बोलताना तिला अश्रू अनावर झाले.

“या परिस्थितीचा लहान मुलांच्या मनावर फार परिणाम होतोय. लॉकडाउनमध्ये असलेल्या प्रत्येक मुलाला प्रश्न पडलाय की हे सर्व काय चालू आहे. आपण मोठे असून अनेकदा पॅनिक होतो, तर लहान मुलांना काय वाटत असेल? आपण दिवसभर बातम्या पाहत असतो. या बातम्यांचा लहान मुलांवर काय परिणाम होत असेल? हे सर्व निराशाजनक आहे. त्यांना हे पाहावं लागतंय हे निराशाजनक आहे. या काळात पालकांनी लहान मुलांची विशेष काळजी घेणं महत्त्वाचं आहे. त्यांच्याशी बोला, त्यांच्या आरोग्याची, सुरक्षेची काळजी घ्या”, असं ती या व्हिडीओतून सांगतेय.

समीराने २०१४ मध्ये अक्षय वर्दे या उद्योजकाशी लग्न केलं. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. करोनाविषयक बातम्यांचा आपल्या मुलांवर होणारा परिणाम समीराला चिंतेचा विषय वाटत आहे. तिने पालकांनाही लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.