आपण कायमच शब्दांनी भरलेल्या जगात वावरत असतो. शब्द हेच भावना व्यक्त करण्याचं माध्यम आहे असा आपला भोळा समज आहे. शब्दांविना सुद्धा भावना व्यक्त करता येऊ शकतात याची अनुभूती देणारा चित्रपट म्हणजे ‘बाबा’. शब्दांच्या पलीकडलं जग या चित्रपटातून सुरेख रेखाटण्यात आलं आहे.

रत्नागिरीतील छोट्याश्या गावात राहणाऱ्या एका सुखी कुटुंबाची ही कथा. माधव (दीपक डोब्रियाल), आनंदी (नंदिता पाटकर) आणि त्यांचा मुलगा शंकर (आर्यन मेघजी) हे स्वतःच्या विश्वात रमणारं कुटुंब. मूकबधिर असून आणि आर्थिक परिस्थिती बेताची असूनही, मुलाला कायम आनंदी ठेवण्यासाठीची माधव आणि आनंदीची धडपड पहिल्या प्रसंगापासूनच दिसते. एके दिवशी अचानक पल्लवी देशपांडे (स्पृहा जोशी) आणि राजन देशपांडे (अभिजित खांडकेकर) पुण्याहून रत्नागिरीत येतात आणि शंकर आपला मुलगा असल्याचे सांगतात. पल्लवीच्या लग्नाआधीच्या संबंधातून हा मुलगा झालेला असतो. पण, तिच्या वडिलांना हे मूल मान्य नसल्याने त्याचे संगोपन माधव आणि आनंदी करतात. मुलाला परत मिळवण्यासाठी आणि त्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी पल्लवी आणि राजन न्यायालयात खटला दाखल करतात. पल्लवी ही शंकरची जन्मदात्री असली तरी वयाच्या आठव्या वर्षापर्यंत आनंदीनेच त्याला स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवलेले असते. अशा परिस्थितीत न्यायाधीश कोणाच्या बाजूने निकाल देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरते. चित्रपटाचा शेवट हृदय पिळवटून टाकणारा आहे.

जन्मापासून मूकबधिर आईवडिलांसोबत वाढल्यामुळे शंकर मूकबधिर नसूनही त्याला बोलता येत नसते. न्यायालयात खटला जिंकण्यासाठी शंकरला बोलतं करणं गरजेचं असतं. कमी वेळ हातात असूनही शेवटच्या दिवसापर्यंत आशावादी राहून माधव आणि आनंदी सगळे प्रयत्न करतात. आपल्या मुलाच्या तोंडून एकतरी शब्द बाहेर पडावा यासाठी त्यांनी केलेले निरागस प्रयत्न पाहून डोळ्यांच्या कडा पाणावतात.

चित्रपटातील सगळ्याच घटना योग्य क्रमाने घडतात. तर्क विसंगती आढळत नाही. कथा प्रेक्षकांना बांधून ठेवणारी असली तरी चित्रपटाच्या शेवटचा काहीसा अंदाज बांधता येतो. चित्रपटाच्या शीर्षकावरून हे नक्कीच लक्षात येते की हा चित्रपट वडील मुलाच्या नात्यावर भाष्य करतो. चित्रपटाच्या शीर्षकाला दिग्दर्शकाने पूर्ण न्याय दिला आहे. मुलाच्या चेहऱ्यावरील हसू पाहण्यासाठी अविरत कष्ट करणारा, वाटेल ते काम करून मुलाला शिकवण्यासाठी धडपडणारा, घरी येताना मुलासाठी आठवणीने चॉकलेट घेऊन येणारा बाप या चित्रपटातून दिसतो.

वडील- मुलगा या नात्यासोबतच इतर नातीही तितक्याच तीव्रतेने दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. केवळ प्रेमापोटी निःस्वार्थीपणे मदत करणारा माधवचा मित्र, त्यांना मनापासून मदत करू इच्छिणारा वकील यांच्या भूमिका रक्तापलीकडील नातीही श्रेष्ठ असू शकतात यावर विश्वास ठेवण्यास हा चित्रपट भाग पाडतो.

उत्तम दिग्दर्शकीय मांडणीसोबतच या चित्रपटाला तितक्याच कसदार अभिनयाची साथ लाभली आहे. दीपक आणि नंदिताने साकारलेले मूकबधिर माधव आणि आनंदी काळजाला भिडणारे आहेत. एकही संवाद नसतानाही आपल्या दमदार अभिनयानं त्यांनी या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव शब्दांपेक्षा जास्त तीव्र आहेत. आपल्या मुलाला समोर बघूनही तो आपल्याजवळ नसल्याची खंत स्पृहाच्या चेहऱ्यावर कायम दिसते. शंकरची जन्मदाती असूनही तो तिला आई मानत नसल्याची सल तिला कायम सतावते. बायकोला समजून घेणाऱ्या एका संयत नवऱ्याच्या भूमिकेत अभिजीतही योग्य दिसला आहे. चित्रपटात कोणतीही व्यक्तिरेखा उगाच आहे असं वाटत नाही. प्रत्येक छोट्या भूमिकेमागे लेखक – दिग्दर्शकाचा बारकाईने केलेला विचार आहे. उत्कृष्ट अभिनय हा या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग आहे.

चित्रपटाची भाषा कुठेही अलंकारिक नाही. साध्या- सोप्या भाषेत नात्यांची अलवार भावना समजून सांगण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न आहे. माधव- आनंदी मूकबधिर असल्याने त्यांच्या प्रसंगांच्या वेळेस योग्य पार्श्वसंगीत देण्यात आले आहे. चित्रपटात योग्य वेळेस गाणी असून रोहन-रोहन, सुश्मित लिमये यांचे संगीत प्रसंगांना साजेसे आहे.

प्रेम ही भावना आदिम आहे. भविष्यातही पालक – मुलाचे नातेसंबंध तितकेच भावनिक राहणार आहेत. भाषेपेक्षा भावनेने जोडले जाणे महत्त्वाचे असते. नात्यांमधील निरागसता, सच्चेपणा, मायेचा ओलावा या सगळ्या गोष्टी हळुवारपणे हा चित्रपट उलगडून सांगतो. नातं सिद्ध करण्यासाठी न्यायालयाला पुराव्यांची गरज असली तरीही खरा विजय हा प्रेमाचाच होतो याची प्रचिती चित्रपटातून येते. शब्दांपलिकडच्या जगावर विश्वास ठेवण्यास हा चित्रपट भाग पाडतो हेच याचे यश आहे.

प्रमुख कलाकार – दीपक डोब्रियाल, नंदिता पाटकर, स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर

बालकलाकार – आर्यन मेघजी

दिग्दर्शन – राज आर गुप्ता

निर्माते – मान्यता दत्त, अशोक सुभेदार

रेटिंग – ३.५ स्टार

प्रदर्शनाची तारीख – २ ऑगस्ट २०१९