गेल्या वर्षभरापासून अनेक चित्रपट सुपरहिट ठरत असतानाच बॉक्स ऑफिसवर रग्गड कमाई करण्यासाठी ‘संजू’ हा चित्रपट सज्ज झाला आहे. येत्या २९ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रदर्शनापूर्वीच त्याला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून संजयच्या जीवनातील अनेक महत्वपूर्ण प्रसंगांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. यामध्येच १९९१ साली गाजलेला एक किस्सा सध्या जोरदार चर्चेत आला आहे.

१९९१ साली ‘साजन’ चित्रपट गाजत असताना माधुरी आणि संजय यांच्या अफेअरबाबत अनेक चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चा रंगत असताना संजयची पहिली पत्नी ऋचा शर्मा न्युयॉर्कमध्ये कर्करोगावर उपचार घेत होती. ‘साजन’ चित्रपटाच्या प्रिमिअरवेळी संजय आणि माधुरी यांची जोरदार चर्चा सुरु झाली होती. त्यांना पाहताच त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या नावाची घोषणा करण्यास सुरुवात केली होती. मात्र याप्रसंगी माधुरी आणि संजय यादोघांनीही मौन बाळगले होते. परंतु तरीदेखील या चर्चा थांबायचं नाव घेत नव्हत्या.

दरम्यान, माधुरी आणि संजय यांच्यामध्ये मैत्रीपलिकडे कोणतेही संबंध नसल्याचे दिग्दर्शक सुभाष घई यांनी सांगितले होते. मात्र या अफवांमुळे अस्वस्थ झालेली ऋचा कर्करोगावरील उपचार अर्धवट सोडून मुलगी त्रिशालाबरोबर भारतात परतली होती. त्यावेळी झालेल्या एका मुलाखतीमध्ये ऋचाने याविषयी स्पष्टीकरणही दिले होते.

‘गेल्या काही दिवसापासून माझ्यात आणि संजयच्या नात्यामध्ये तणाव आहे. आमच्यात सतत वाद सुरु आहेत. त्यामुळे या भांडणाचा शेवट म्हणून ‘मला घटस्फोट देऊ इच्छितो का’ ? असा प्रश्न मी संजयला विचारला होता. मात्र त्याने स्पष्ट नकार दिला होता आणि मलादेखील संजयबरोबरच राहायचं होतं. मात्र माधुरी आणि संजय यांच्याविषयी पसरत असलेल्या अफवांमुळे मला असुरक्षित वाटत होतं त्यामुळे मी उपचार सोडून भारतात परतले, असं झालेल्या मुलाखतीत ऋचाने सांगितले.

संजय आणि ऋचाचं लग्न १९८७ मध्ये झाले होते. मात्र ऋचाला ब्रेन ट्युमर झाल्याने १९९६मध्ये तिचा मृत्यू झाला. त्यानंतर संजयने रिया पिल्लई हिच्याबरोबर १९९८मध्ये लग्न केले मात्र त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. त्यांनी २००५ मध्ये वेगळं होण्याचा निर्णय घेतला.संजयच्या जीवनातील हे चढउतार संजू या चित्रपटात चित्रीत करण्यात आले असून ते लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.