बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचं आयुष्य एखाद्या चित्रपटापेक्षा काही कमी नाही. त्याच्या जीवनावर आधारित ‘संजू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. संजूबाबाच्या आयुष्यातील बऱ्याच प्रसंगांवर या चित्रपटातून शक्य त्या सर्व मार्गांनी प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. २०१३ मध्ये ज्यावेळी संजय दत्तला शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा त्याची रवानगी पुण्याच्या येरवडा कारागृहात करण्यात आली होती. त्या ठिकाणी त्यालाही इतर कैद्यांप्रमाणेच वागणूक दिली जात होती. जेलमधल्या त्या दिवसांनी माझ्यातील अहंकार मोडला आणि मला चांगला व्यक्ती बनवलं, असं संजय म्हणतो.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला की, ‘जेलमधल्या त्या दिवसांत मी बरेच चढउतार पाहिले. त्याची सकारात्मक बाजू पाहिली असता, मला त्यातून खूप काही शिकायला मिळालं. त्या दिवसांनी मला चांगला व्यक्ती बनवलं. पण कुटुंबीयांपासून दूर राहणं आव्हानात्मक होतं.’

Sanju Box Office Collection Day 1: रणबीरच्या ‘संजू’ने सलमानलाही टाकलं मागे

जेलमध्ये असतानाही संजय दत्तने त्याच्या शरीरयष्टीवर मेहनत घेतली. मातीची भांडी किंवा इतर टाकाऊ वस्तू डंबेल्स म्हणून वापरल्याचं त्याने सांगितलं. त्याचप्रमाणे जेलमधल्या इतर कैद्यांनी त्या काळात खूप साथ दिल्याचंही तो सांगतो. ‘जेव्हा जेव्हा मी खचून जायचो तेव्हा इतर कैद्यांनी मला प्रोत्साहित केलं आणि त्यांनी कठीण काळात माझी साथ दिली. ज्या दिवशी मी कारागृहातील सुटलो तो माझ्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा दिवस होता. त्यावेळी मला वडिलांची खूप आठवण येत होती,’ असं संजय म्हणाला.

‘संजू’ या चित्रपटात कारागृहाची शिक्षा भोगण्यासाठी गेलेल्या संजूबाबाने कारागृहात कशा प्रकारे दिवस काढले यावरुनही पडदा उचलण्यात आला आहे. त्याचप्रमाणे त्याच्या प्रेमप्रकरणांपासून ते आई- वडिलांसोबत असणाऱ्या समीकरणांपर्यंत सर्वच गोष्टींचा आढावा चित्रपटात घेण्यात आला आहे.