बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये एकेकाळी श्रीदेवीचे नाव होते. ८०-९०चे दशक तिने आपल्या अदाकारीने आणि अभिनयाने गाजवले. ८०च्या दशकात संजय दत्तने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केलेली. त्यावेळी या दोघांमध्ये तसं बघायला गेलं तर काहीच कनेक्शन नव्हतं. पण या दोघांनी एकत्र काम केलं नाही, यामागचं कारण तुम्हाला माहितीये का?
‘अमर उजाला’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, यामागे एक खूप मोठा किस्सा आहे. १९८३ साली घडलेल्या या घटनेमुळे श्रीदेवी पूर्णपणे हादरली आणि तिने पुढे कधीच संजूबाबासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. इतकेच नव्हे तर आपल्या एका चित्रपटातून त्याला बाहेर काढण्याचा निर्णयही तिने घेतला. श्रीदेवी ‘हिंमतवाला’ चित्रपटासाठी शूटींग करत होती तेव्हाची ही घटना आहे. संजूबाबा त्यावेळी श्रीदेवीचा मोठा चाहता होता. त्यावेळी संजूबाबा करियरमध्ये उतार चढावाला सामोरं जात होता. तेव्हा संजूबाबाने ड्रग्स घेतले होते तसेच तो मद्यधुंद अवस्थेत होता. त्यातच त्याने सेटवर जाऊन श्रीदेवीची भेट घेण्याचा निर्णय घेतला.
वाचा : ‘तुम बिन’नंतर रुपेरी पडद्यापासून दुरावलेली ही अभिनेत्री सांभाळतेय अब्जावधींचा व्यवसाय
सेटवर श्रीदेवी न दिसल्याने संजूबाबाने असं काही केलं की त्यामुळे तिच्या रागाचा पारा चढला. मद्यधुंद अवस्थेतच तो श्रीदेवीच्या चेंजिंग रुममध्ये गेला. संजय दत्त आपल्या रुममध्ये असा धाडकन आणि तोही नशेत येईल याची कल्पनाही तिने केली नव्हती. या घटनेबद्दल खुद्द संजूबाबानेच फिल्मफेअर मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. त्यावेळी नक्की काय घडलं ते त्याला आठवत नव्हतं. पण, श्रीदेवीने नंतर आपल्या तोंडावर जोरात दरवाजा आदळल्याचं त्यानं सांगितलं.
वाचा : जाणून घ्या सर्वांची मनं जिंकणारी ‘दुल्हन’ सध्या करतेय तरी काय
यानंतर श्रीदेवीने संजूबाबासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. पण, वेळेसमोर कोणाचंच काही चालत नाही. अखेर, १९९३ साली या दोघांनी ‘गुमराह’ चित्रपटात एकत्र काम केलं. हा या दोघांचा एकमेव चित्रपट आहे.