‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटांना मिळालेल्या यशानंतर आता त्याचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता अर्शद वारसीने यासंदर्भातील माहिती दिली आहे. या वर्षाच्या मध्यापर्यंत किंवा अखेरपर्यंत ‘मुन्नाभाई ३’च्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याचं त्याने सांगितलं आहे.
राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा चित्रपट २००३ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याच्या तीन वर्षांनी ‘लगे रहो मुन्नाभाई’ हा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘मुन्नाभाई ३’साठी जवळपास १० वर्षांहून अधिकचा काळ लागला. पहिल्या दोन चित्रपटांप्रमाणेच संजय दत्त मुन्नाभाई तर अर्शद सर्कीटच्या भूमिकेत असेल.
वाचा : फरहान-शिबानीचा गुपचूप साखरपुडा; मार्च-एप्रिलमध्ये करणार लग्न?
‘चित्रपट झाल्यानंतर त्या भूमिकेला मी विसरून जातो. त्यामुळे ‘लगे रहो मुन्नाभाई’तील सर्कीटसाठीही मला फार वेळ लागला. पुन्हा पुन्हा पहिल्या चित्रपटातील दृश्ये बघून मी ती भूमिका साकारली होती. आता त्याहून जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. चित्रपटाच्या पटकथेवर सध्या काम सुरू आहे. त्यामुळे जून किंवा वर्षाअखेरीस शूटिंगला सुरुवात होईल,’ असं अर्शदने सांगितलं. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांना मुन्नाभाई आणि सर्कीटची धमाल पाहायला मिळणार हे नक्की.
अर्शदने यावेळी ‘गोलमाल ५’ हा गोलमाल सीरिजमधला चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगितलं आहे. ‘सिम्बा’मध्ये गोलमाल टीमने कॅमिओ केला होता. त्यावेळीच ‘गोलमाल ५’चे संकेत रोहित शेट्टीने दिले होते. यावर आता अर्शदने शिक्कामोर्तब केला आहे.