‘पद्मावती’ या चित्रपटावर चर्चा करण्यासाठी संसदीय समितीकडून दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना पाचारण करण्यात आले आहे. चित्रपटाच्या वादावर त्यांचे काय म्हणणे आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांना बोलावण्यात आले. त्यासोबतच केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय आणि सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनाही बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे.

संसदीय समितीने गुरुवारी ही बैठक बोलावली असून या चर्चेत संसदेचे सदस्य अभिनेते परेश रावल आणि राज बब्बरसुद्धा सहभागी होणार आहेत. राजपूत संघटनांचा चित्रपटाला होणार विरोध, त्यांनी केलेले आरोप, चित्रपटाचे कथानक या सर्व मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

वाचा : ‘घुमर’वर नृत्य केल्याने मुलायम सिंह यादव यांची सून वादाच्या भोवऱ्यात

एकीकडे राजपूत संघटनांकडून ‘पद्मावती’ला तीव्र विरोध होत असताना तांत्रिक बदलांची कारणे देत सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपट निर्मात्यांकडे परत पाठवण्यात आला. या पार्श्वभूमीवर प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि बिहार या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तेथे चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. त्यामुळे आता संसदीय समिती काय तोडगा काढते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.