संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटाला बऱ्याच राजपूत संघटनांनी विरोध केला असला तरीही कलाकारांनी मात्र या चित्रपटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनात बऱ्याच अडचणी निर्माण करत राजपूत संघटनांनी भन्साळींसमोरील बरेच मार्ग बंद करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांचे हेच प्रयत्न उलथून पाडण्यासाठी ‘इंडियन फिल्म्स अॅण्ड टीव्ही डिरेक्टर्स असोसिएशन’ (आयएफटीडीए) आणि काही कलाकार संघटनांनी कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या हेतूने चित्रीकरणाचे सर्व काम थांबवत, ‘ब्लॅकआऊट’ करत आंदोलन केले.

इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्सूसर्स असोसिएशन, वेस्टर्न इंडिया सिनेमॅटोग्राफर्स असोसिएशन, स्क्रीन राइटर्स असोसिएशन, मुव्ही स्टंट आर्टीस्ट्स असोसिएशन आणि इतर संघटनांच्या यात सहभाग पाहायला मिळाला. ‘मै आझाद हूँ’ अशा घोषवाक्याच्या आधारे हे आंदोलन करण्यात आले.

वाचा : अभिनेते लिलीपूट यांच्यावर कर्जाचा डोंगर, मुलीने…

एकिकडे कलाकार संघटनांनी राजपूत संघटनांविरोधात आंदोलन केले असतानाच ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकरणात आपली भूमिका मांडून या वादावर तोडगा काढावा अशी मागणी केली आहे. सिन्हांसोबतच इतरही बॉलिवूड कलाकारांनीसुद्धा हीच मागणी केली आहे, त्यामुळे आतातरी या वादात सरकार हस्तक्षेप करणार का, याकडे चित्रपटाच्या टीमसमवेत अनेकांचेच लक्ष लागून राहिले आहे.