दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पद्मावत’ अखेर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. २५ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सेन्सॉर बोर्डाच्या निर्देशांनुसार चित्रपटाचे ‘पद्मावती’ हे नाव बदलून ‘पद्मावत’ असे ठेवण्यात आले आहे. यु/ ए प्रमाणपत्र देत सेन्सॉरने प्रदर्शनाची वाट मोकळी केली आहे. याच दिवशी अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने या दोन बहुचर्चित चित्रपटांमध्ये चांगलीच टक्कर पाहायला मिळणार आहे.
‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी सेन्सॉर बोर्डाने ‘पद्मावत’ला प्रमाणित केले. दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट २ तास ४३ मिनिटांचा आहे.
१८० कोटींचा बजेट असलेल्या भन्साळी यांच्या चित्रपटाला सुरुवातीपासूनच राजपूत संघटनांकडून तीव्र विरोध होत आहे. इतिहासाची मोडतोड करून चित्रपट निर्मिती केल्याचा आरोप राजपूत करणी सेनेने केला आहे. देशभरात ठिकठिकाणी याविरोधात आंदोलने, निदर्शनेदेखील झाली होती. इतकेच नाही तर भन्साळी आणि दीपिका पदुकोणला जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या. सेन्सॉर बोर्डाने अखेर हा तिढा सोडवण्यासाठी इतिहासकार आणि राजघराण्याच्या उत्तराधिकाऱ्यांची सहा सदस्यीय समिती नेमली. या समितीने काही बदल सुचवले. फक्त सल्ला घेण्यासाठी ही समिती स्थापन केल्याचे सेन्सॉरचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी स्पष्ट केले होते. ‘सेन्सॉर बोर्डाने निर्देश देताना समितीच्या सल्ल्यांचा विचार केला आहे. मात्र प्रमाणित करण्याचा पूर्ण अधिकार हा सेन्सॉरकडेच आहे. त्यामुळे यातून विनाकारण कोणतेही वाद निर्माण करु नये,’ असे प्रसून जोशी म्हणाले.
दुसरीकडे ‘पॅडमॅन’ या चित्रपटातून ट्विंकल खन्ना निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. अक्षय कुमारच्या या चित्रपटाच्या गाण्यांना, ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे एकाच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या या दोन चित्रपटांमध्ये जबरदस्त टक्कर पाहायला मिळणार हे नक्की.