अनेक वादविवादांच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर अखेर संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ चित्रपट गेल्याच आठवड्यात भारतात प्रदर्शित झाला. मात्र, एक वाद संपत नाही तोवर दुसऱ्या वादाला तोंड देण्यासाठी आता भन्साळी यांना कदाचित सज्ज राहावे लागणार आहे. कारण ‘पद्मावत’मधून इस्लाम धर्मीयांच्या भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप करत चित्रपटावर मलेशियात बंदी घालण्यात आली आहे.

वाचा : व्यासपीठावरच या कलाकाराने घेतला अखेरचा श्वास

‘मलेशिया नॅशनल फिल्म सेन्सॉरशिप बोर्ड’ (एलपीएफ)ने भन्साळींच्या ‘पद्मावत’वर त्या देशात बंदी घातली आहे. मलेशियात मुस्लिम नागरिक सर्वाधिक प्रमाणात राहतात. त्यांचा विचार करता चित्रपटाची कथा हा चिंतेचा विषय ठरत असल्याचे मत एलपीएफचे अध्यक्ष मोहम्मद झांबेरी अब्दुल अझिझ यांनी मांडले. अझिझ म्हणाले की, ‘पद्मावतमधील कथा इस्लाम धर्मीयांच्या भावना दुखावणारी आहे. त्यामुळे मुस्लिमांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या या देशात हा चित्रपट प्रदर्शित करणे योग्य ठरणार नाही.’

जगभरात मोठ्या स्तरावर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांना मलेशियात अनेकदा बंदी घालण्यात आली आहे. याआधी डीस्नेच्या ‘ब्युटी अॅण्ड द बिस्ट’मधील समलैंगिक भागामुळे या चित्रपटावर तेथे बंदी घालण्यात आली होती. तसेच, गेल्यावर्षी त्यांनी दिग्दर्शक लीना हेन्ड्री यांच्यावरही कार्यवाही केली होती. लीना यांनी ‘नो फायर झोन : द किलिंग फिल्ड्स’ या डॉक्युमेण्ट्रीचे खासगी स्क्रिनिंग ठेवले होते.

VIDEO : ‘लल्लाटी भंडार’वर खिल्जी थिरकतो तेव्हा

मलेशियातील सेन्सॉरशिपचे कायदे अनियंत्रित पद्धतीने वापरले जात असल्यामुळे त्याचा परिणाम तेथील चित्रपट निर्मितीलाही होत असल्याचे ‘राइट्स अॅडव्होकसी ग्रुप्स’चे म्हणणे आहे.