अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यातील अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं देणारा चित्रपट ‘संजू’ गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या बहुचर्चित चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता होती. जेव्हा रणबीर कपूरला संजूबाबाच्या रुपात मोठ्या पडद्यावर पाहिलं गेलं, तेव्हाच अनेकांनी हा चित्रपट रणबीरच्या करिअरला नक्कीच सावरणार असा अंदाज बांधला. हा अंदाज आता खरा ठरताना दिसत आहे. कारण प्रदर्शनाच्या अवघ्या तीन दिवसांत ‘संजू’ने कमाईचा १०० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे.

तीन दिवसांत ११७ कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने सलमान खानलाही मागे टाकलं आहे. सलमानच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाने तीन दिवसांत ११५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ३४.७५ कोटी रुपयांची विक्रमी कमाई ‘संजू’ने केली. या वर्षात सर्वाधिक कमाईने ओपनिंग करणारा हा पहिला चित्रपट ठरला. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी ३८.६० कोटी रुपये आणि रविवारी ४३.६५ कोटी रुपये कमवत हा एकूण आकडा जवळपास ११७ कोटी रुपये इतका झाला. चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बालाने ही माहिती दिली आहे.

बॉलिवूडला एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक म्हणून राजकुमार हिरानी ओळखले जातात. रणबीरचा पाच वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘ये जवानी है दिवानी’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर हिट ठरला होता. त्यानंतर ‘बेशरम’, ‘जग्गा जासूस’ आणि ‘बॉम्बे वेल्वेट’ हे चित्रपट दणक्यात आपटले. अखेर देशभरातील ४००० स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेल्या ‘संजू’ने रणबीरच्या करिअरला सावरलं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.