‘संजू’ हा चित्रपट पाहिल्यानंतर चर्चेला उधाण फुटलं आहे. एकीकडे या वर्षी प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून त्याचं कौतुक होत आहे. सलमान खानच्या ‘रेस ३’लाही या चित्रपटाने मागे टाकलं आहे. तर दुसरीकडे हिरानी आणि संजय दत्त यांच्यातील मैत्रीचे संबंध आणि त्यातून चित्रपटात त्याची बाजू घेण्याचा झालेला प्रयत्न यावरही बोललं जातं आहे. मात्र या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या काय अपेक्षा असतील, ते काय विचार करतील, याचं दडपण आपण कधीच घेतलं नव्हतं, असं हिरानी यांनी चित्रपट प्रदर्शनापूर्वीच जाहीर केलं होतं. माझ्यावर हा चित्रपट बनवावा अशी सक्ती कोणी केलीच नव्हती. त्यामुळे संजय दत्तला एका ठरावीक प्रतिमेतूनच लोकांसमोर आणायचं असा उद्देश असण्याचंही काही कारण नव्हतं, असं हिरानींनी म्हटलं आहे.

बॉलीवूडमध्ये सर्वाधिक वादग्रस्त कारकीर्द आणि वैयक्तिक आयुष्य लाभलेल्या अभिनेता संजय दत्तची कथा चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आणि तेही राजकुमार हिरानी स्वत: चित्रपट दिग्दर्शन करणार हे जाहीर झालं. तेव्हाच हा संजयची प्रतिमा सुधारण्यासाठी आहे की काय, या चर्चाना सुरुवात झाली होती. मात्र दिग्दर्शक म्हणून हिरानी यांनी ज्या पद्धतीचे चित्रपट दिले आहेत ते पाहता ‘संजू वेगळा असेल’ हाही विचार चाहत्यांच्या मनात रेंगाळत होता. या चित्रपटाची कथा खुद्द हिरानी आणि अभिजीत जोशी यांनी लिहिली आहे. संजय दत्तही या कथालेखनाचा एक भाग असणार हे साहजिक आहे. मात्र हा चित्रपट बनवावा असं कोणीही आम्हाला कधीच सांगितलं नव्हतं. तुम्हाला लोकांच्या अपेक्षांचं दडपण तेव्हाच येतं जेव्हा तुम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरून चित्रपट करत असता. आमच्या बाबतीत ही गोष्टच घडलेली नाही पण चित्रपटकर्मी म्हणून आम्ही गोष्टीसाठी खूप खटपट करत असतो. आम्ही जेव्हा संजयकडून गोष्ट ऐकली तेव्हा याच्यावर चित्रपट व्हायलाच हवा, असा विचार आला. त्यानंतर आम्हीच त्याला विचारलं की, आम्ही जर यावर चित्रपट केला तर तो पाहण्याची हिंमत तुझ्यात आहे का? तुझी कथा आमच्या पद्धतीने लिहून पडद्यावर आली तर तुला काही अडचण आहे का, असे संजय दत्तलाच उलट प्रश्न विचारल्याचं हिरानी यांनी सांगितलं. पण संजय दत्तसारखा धाडसी अभिनेता दुसरा कोणी नसेल, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. ज्या मोकळेपणाने संजयने आपल्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी सांगितल्या तशी हिंमत आणखी कोणी केली नसती. मुळात मला कोणालाच पडद्यावर अमुक एका पद्धतीने दाखवायचं नव्हतं. ही काही कोणाची जाहिरात नाही, असंही हिरानी यांनी सांगितलं.

चरित्रपट करताना दिग्दर्शक-लेखक स्वातंत्र्य घेतात, मात्र ‘संजू’ हा वास्तव घटनांवर आधारित चित्रपट आहे. तो रुपेरी पडद्यावर फिट दिसावा यासाठी मांडणीत जे नाटय़ लागतं ते चित्रपटात आहे. शिवाय, अनेक व्यक्तींना कथेत फाटा दिला आहे. नाहीतर चित्रपट खूपच मोठा झाला असता, असं हिरानींनी स्पष्ट केलं आहे. अर्थात हिरानींनी काहीही सांगितलं असलं तरी प्रेक्षकांनीही कुठल्याच गोष्टी मनात न ठेवता संजूबाबाच्या आयुष्यावरचा चित्रपट मोठय़ा प्रेमाने पाहिला आहे हे सध्याच्या आकडय़ांवरून दिसून येतं आहे. त्यामुळे ‘संजू’ पाहून संजय दत्तची प्रतिमा सुधारेल की नाही माहिती नाही, पण रणबीर कपूरची नैय्या मात्र दोनशे कोटींच्या तीराला लागणार यात शंका नाही.