संजय दत्तच्या बहुचर्चित बायोपिकचा पहिला पोस्टर आणि टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटाचं नाव ‘संजू’ असं आहे. रणबीर कपूर यामध्ये संजूबाबाची भूमिका साकारणार असून त्याच्या लूकमध्ये झालेला बदल थक्क करणारा आहे. आईला गमावल्यापासून ते कारागृहाच्या शिक्षेपर्यंत संजूबाबाच्या आयुष्यातील चढउतार या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर येणार आहे. रणबीर कपूरसोबतच यामध्ये सोनम कपूर, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा, मनिषा कोइराला यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
एक मिनिट २५ सेकंदांच्या या टीझरमध्ये संजय दत्तची जीवनगाथाच मांडली आहे. ‘अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है’, असं म्हणत रणबीर येरवडा कारागृहातून बाहेर पडताना या टीझरची सुरुवात होते. अमली पदार्थांच्या व्यसनापासून ते कारागृहात रवानगीपर्यंत सर्वकाही यात पाहायला मिळतंय. ३०८ गर्लफ्रेंड्स आणि एक एके ५६ रायफल यांचाही टीझरमध्ये उल्लेख आहे. संजू- माणूस एक आयुष्य अनेक, अशा टॅगलाइनसह प्रदर्शित झालेल्या टीझरचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
पाहा टीझर-
One man…many lives! #RanbirKapoor in and as #Sanju. pic.twitter.com/vhZUemQoGW
— Filmfare (@filmfare) April 24, 2018
यामध्ये संजय दत्तच्या आईची म्हणजेच नर्गिस यांची भूमिका मनिषा कोइराला साकारणार असून परेश रावल त्याच्या वडिलांची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. दिया मिर्झा संजूबाबाची पत्नी मान्यता दत्तच्या भूमिकेत तर अनुष्का शर्मा एका पत्रकाराच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. येत्या २९ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.