sara-shravan250भूमिकांमधील आव्हान कलाकारांना नेहमीच खुणावत असतं. वास्तवात आपण जसे आहोत तसे पडद्यावर न दिसता आपल्यापेक्षा अगदी वेगळं पात्र साकारायला मिळावं अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. अभिनेत्री सारा श्रवण हिची आव्हानात्मक भूमिका साकारण्याची इच्छा ‘व्हॉट अबाऊट सावरकर?’ या चित्रपटाने पूर्ण केली आहे. या मराठमोळ्या अभिनेत्रीला कारकीर्दीच्या महत्त्वाच्या वळणावर ‘व्हॉट अबाऊट सावरकर?’ सारख्या मराठी चित्रपटात मणिपुरी तरुणीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली.
रोहित शेट्टी, अतुल परब यांची  निर्मिती असलेल्या ‘व्हॉट अबाऊट सावरकर?’ हा सिनेमा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार मांडणारा आहे. सावरकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजात नवी क्रांती घडवू पाहणाऱ्या ध्येयवेडया तरुणाची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. सावरकरांच्या विचारांनी केवळ महाराष्ट्रातीलच तरुणांना स्फूर्ती देण्याचं काम केलं नाही, तर भारताच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या विचारांनी पेटून उठलेले तरुण-तरुणी आहेत. पंजाबपासून मणिपूरपर्यंत पसरलेल्या सावरकरांच्या वैचारिक महासागरातील पाईक होण्याचं भाग्य एका तरुणीला लाभलं, हेच पात्र सारा श्रवणने  ‘व्हॉट अबाऊट सावरकर?’ चित्रपटात साकारलं आहे. ‘व्हॉट अबाऊट सावरकर? मध्ये साराने सुनीती सिंग नावाच्या तरुणीची भूमिका साकारली आहे, या तरुणीच्या मनावर सावरकरवादी विचारांचा पगडा आहे. चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिमान मराठेच्या वैचारिक लढ्यात ती ठामपणे उभी आहे.
१७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात शरद पोंक्षे, विवेक लागू, अविनाश नारकर, अतुल तोडणकर, सारा श्रवण,श्रीकांत भिडे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.