६५ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव सत्र दुसरे

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात गुरुवारी पं. भुवनेश कोमकली यांच्या गायनाने सुरुवात झाली. ‘मुलतानी’ या तोडी थाटातील रागाच्या विलंबित एकतालातील ‘वेगी आ रे साई’ ही बंदिश आर्त भावनांनी अभिव्यक्त कसे व्हावे याचा वस्तुपाठ ठरली. ‘दिल बेकरार’ ही द्रुत त्रितालातील बंदिश दाद घेऊन गेली. यानंतर ‘नंद केदार’ ही मध्य त्रितालातील ‘लागे विराय चुनारी।’ तसेच छैला तुम..ही द्रुत बंदिश सादर केली. शेवटी माळवा लोकधून राग काफीमध्ये दादरा तालात सादर केली. पं. कुमार गंधर्व यांची गायकी पिढय़ान् पिढय़ा चालू ठेवण्याचे, हा अमूल्य असा ठेवा सांभाळण्याचे मोठे अवघड शिवधनुष्य पेलण्याचे काम हा कलाकार करत आहे. ‘माझ्या वडिलांची ही मिराशी तुझी चरणसेवा पांडुरंगा’ या तुकाराममहाराजांच्या अभंगानुसार खटक्या, मुरकीच्या आक्रमक ताना गळ्यात फिरक असल्याशिवाय निघतच नाही, असे सर्व गानप्रकारातून कुमारांची शैली पुणेकर रसिकांना लाभली.

विदुषी कला रामनाथ यांचे व्हायोलिनवादन झाले. पं. योगेश समसी यांनी तबल्याची साथ केली. ‘श्याम कल्याण’ या रागातील गत तिलवाडा तालात सादर केली. यानंतर द्रुत त्रितालात हीच गत मोठय़ा ताक दीने सादर केली. तसेच द्रुत एकतालात हीच गत होती. ‘कजरी’ धून वाजवून त्यांनी रसिकांची दाद घेतली. वादन सुरेल होते. धीम्या लयीत ‘श्याम कल्याण’ची सुरावट सुरू झाली. गमकयुक्त आलापी, वादी-संवादी स्वरांचे भान राखत चाललेली गायकी अंगाची आलापी खूपच दर्जेदार होती. घसीट तसेच तंत अंग आणि त्रितालाचा वेगाचा उच्चांक या वादिकेने गाठला होता. स्वरांचा नेमकेपणा, अंगभूत अशी लय असे दैवदुर्लभ गुण या गायिकेच्या वादनामधून श्रोत्यांच्या नक्कीच कायम स्मरणात राहतील.

सवाई महोत्सव घोषित झाला आणि कौशिकी चक्रवर्ती यांचे नाव कळले की हे गायन कधी ऐकायला मिळणार याची उत्सुकता रसिकांना लागून राहिली होती. पं. भीमसेनजींनी म्हटले होते. ‘‘हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत हे कौशिकी चक्रवर्तीच्या हाती सुरक्षित आहे व राहील.’’ रत्नपारखी म्हणतात ते यांना. प्रचंड रियाजामधून तावून सुलाखून निघालेले असे हे गायन असते. आज सुरुवातीस ‘मारुबिहाग’ या रागातील ‘रतिया हमारी’ ही बंदिश विलंबित एकतालात सादर केली. आलापांनीच रागाचा पाया घातला जातो, यानुसार आपल्या दाणेदार टपोऱ्या स्वरांनी आपले स्वर विचार खूप छान मांडले. सरगमचे आलाप, बोल आलाप यांनी रागभाव खुला होत होता. ‘बागेश्री’ रागातील तराणा झपतालात सादर केला. खटक्याच्या ताना वैविध्याने गायल्या. मध्य सप्तकातील ताना चालू असताना मध्येच आकाशात सौदामिनी चमकावी तशी अती तार सप्तकातील षड्जला स्पर्श करणारी तान प्रक्रिया खूप सुंदर होती. ‘याद पियाकी आये’ ही ठुमरी नजाकतीने गाऊन आपले देखणे गायन थांबविले. पं. जसराज यांचे गायन झाले. स्वरसंवादिनीवर पं. अप्पा जळगावकरांचे शिष्योत्तम मुकुंद पेटकर यांची तर तबल्यावर केदार पंडित यांची साथ होती. विलंबित एकतालात राग ‘शंकरा’ आपल्या खास आलापांनी सादर केला. ‘अडाण्या’तील तराणा आणि राग ‘बसंत’ सादर करून आपले गायन थांबविले.

(लेखक संगीत समीक्षक आणि बासरीवादक आहेत.)