सयाजी शिंदे, हे नाव अनेकांच्याच परिचयाचं झालं आहे. मराठी, हिंदी, दाक्षिणात्य चित्रपटांमधील दमदार भूमिकांमुळे ते प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाले. सयाजी शिंदे यांच्या ऑफस्क्रीन आयुष्यातील बऱ्याच गोष्टी चाहत्यांना माहीत नसतील. अशाच काही गोष्टी त्यांनी कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमात मनमोकळेपणाने सांगितल्या. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी बँकेत नोकरी करत असतानाचा एक किस्सा त्यांनी यावेळी सांगितला.
‘संघर्षाच्या कालखंडात आपल्या आयुष्यात काही महत्त्वाच्या घटना घडतात. अशा वेळेस अपमान होतो, बऱ्याचदा फजिती होते. एखादा अपमान लक्षात राहिलेला तुझ्या आहे का,’ असा प्रश्न मकरंद अनासपुरेनं त्यांना विचारला. त्यावर उत्तर देताना त्यांनी हा प्रसंग सांगितला. ‘मी बँकेत कामाला होतो. त्यावेळचे माझे व्यवस्थापक रोज मला ते आल्यावर आणि जाताना त्यांना नमस्कार करायला सांगायचे. मी म्हणालो, मी पण बँकेत काम करतो, तुम्हीपण इथेच काम करता. यात नमस्कार करण्याचा काय संबंध? पण फक्त नमस्कार न केल्याने वेळेत माझं काम करूनसुद्धा ते मला रोज उशिरा आल्याचा शेरा द्यायचे. त्यामुळे मला एका महिन्यात जवळपास २४ मेमो मिळाले होते. पण तरीही मी नमस्कार केला नाही. माझी तक्रार महाव्यवस्थांपकांकडे गेली. त्यांना सांगितलं मी माफी मागणार नाही कारण ते माफी मागण्यासारखे नाहीत. त्यापेक्षा मी राजीनामा देईन असं त्यांना म्हटलं. ते म्हणाले अशी नोकरी परत मिळणार नाही. त्यांना म्हटलं मी हमाली करणं पसंत करेन पण नमस्कार करणार नाही,’ असं सयाजी यांनी सांगितलं.
वाचा : ‘घरी जणू देवच आले’; सयाजी शिंदेंनी सांगितला रजनीकांत यांचा किस्सा
मी जर चुकीचा नाही तर मी कुठेही झुकणार नाही असा सयाजी शिंदे यांचा सुरुवातीपासूनच स्वभाव राहिल्याचं मकरंदनं स्पष्ट केलं. या कार्यक्रमात सयाजींनी त्यांना कोणकोणत्या गोष्टींचा राग येतो हेसुद्धा सांगितलं. ‘उशिरा आल्याचा, खोटं बोलण्याचा, फसविल्याचा, हो म्हणून कामात चालढकल केल्याचा राग येतो. सरकारी कामांमध्ये जी दिरंगाई केली जाते त्याचा खूप संताप येतो,’ असं ते म्हणाले.