अभिनेता सैफ अली खानची ‘तांडव’ ही सीरिज सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ‘तांडव’विरोधात सहा राज्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आला. त्यामुळे ‘तांडव’च्या निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेदेखील ही याचिका फेटाळली आहे. तसंच या सीरिजशी संबंधित कोणत्याही कलाकाराला किंवा व्यक्तीला अटकेपासून सुरक्षा देण्यात येणार नाही असं सांगितलं आहे.

बुधवारी सर्वोच्च न्यायालयात ‘तांडव’ सीरिजच्या याचिकेवर सुनावणी करण्यात आली. या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सीरिजच्या निर्मात्यांना फटकारलं आहे. तसंच अभिनेता मोहम्मद झिशान अय्युब, अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि ‘तांडव’च्या मेकर्सना अटकेपासून सुरक्षा देण्याचं नाकारलं आहे. इतकंच नाही तर अटकपूर्व जामिनासाठी आणि एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

‘तांडव’ सीरिजच्या पहिल्या एपिसोडमध्ये हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर सहा राज्यांमध्ये ‘तांडव’विरोधात ७ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. यात दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्याविरोधातही हे एफआयआर दाखल झाले आहेत. त्यामुळेच हे FIR रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. तसंच सुरक्षा पुरवण्याचीही मागणी करण्यात आली होती.