बॉलिवूडचे शहेनशहा यांच्या छोट्यात छोट्या गोष्टीवरही संपूर्ण जगाचं लक्ष असतं. ते काय करतात काय लिहीतात याकडे त्यांचे चाहते नेहमीच लक्ष ठेवून असतात. बिग बीही त्यांच्या चाहत्यांना निराश करत नाहीत. शक्य तितके ते आपल्या चाहत्यांना त्यांच्या दिनक्रमाची माहिती देत असतात. आता हेच पाहा ना.. त्यांचे काम ठरलेल्या वेळेआधीच संपल्याची माहितीही त्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांना दिली होती.

काम लवकर संपलं की कळत नाही की नक्की पुढे काय करावं. असा प्रश्न त्यांनी विचारला असता त्यांना अनेक उत्तरं मिळाली होती. पण सगळ्यात आकर्षक उत्तर दिलं ते अभिनेत्री शबाना आझमी यांनी. ‘अचानक काम वेळेपूर्वीच संपलं तरी मोठी समस्या निर्माण होते की आता काय करायचं? ट्विटर आणि एफबीजी जिंदाबाद’ असं ट्विट अमिताभ यांनी केलं. त्यावर शबाना आझमी यांनी ‘वर्कोहॉलिक माणसा! तुम्ही काही करू नका… फक्त डोकं खाजवा आणि गप्पा मारा’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. अर्थात गंमतीत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. या दोघा दिग्गजांनी ‘परवरिश’ आणि ‘अमर अकबर अॅन्थनी’ या सिनेमांत एकत्र काम केलंय.

अमिताभ लवकरच सलमान खानसोबत ‘रेस ३’ मध्ये दिसणार आहेत. अमिताभ आणि सलमान यांनी याआधी ‘बागबान’ आणि ‘बाबुल’ सिनेमातही एकत्र काम केलेले. पण, हे सिनेमे ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबियांची सून होण्यापूर्वी चित्रीत झालेले. या सिनेमाशिवाय नागराज मंजुळे यांच्या पहिल्या हिंदी सिनेमात ते काम करणार आहेत. नागराज यांच्या या सिनेमाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. अमिताभ सिनेमात नागपूरमध्ये जवळपास दशकभरापूर्वी ‘स्लम सॉकर’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करणारे विजय बार्से यांची भूमिका साकारताना दिसतील. फुटबॉल खेळात आपले भवितव्य घडवण्यासाठी ही संस्था गरीब मुलांना मदत करते.

Story img Loader