बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानने दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या टी २० लीगमधील संघ विकत घेतला आहे. लंडनमध्ये झालेल्या एका समारोहात दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने या स्पर्धेतील संघ आणि संघमालक यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी शाहरूख खान टी २० लीगमध्ये केप टाऊन संघाचा मालक असल्याची घोषणा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू जे पी ड्युमिनीने केली.

‘टी २० ग्लोबल लीग’ असे नाव असलेल्या या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होणार आहेत. शाहरूख याआधीसुद्धा इंडियन प्रीमियर लीग आणि कॅरेबियन प्रीमियर लीगमधील संघाचा मालक आहे. आयपीएलमध्ये किंग खान शाहरूख कोलकाता नाइटरायडर्सचा सहप्रसिद्धीकर्ता आहे. तसेच सीपीएलमध्ये तो त्रिबागो राइडर्स संघाच्या मालकांपैकी एक आहे. शाहरूखव्यतिरिक्त दिल्ली डेअरडेविल्स संघाची मालकी हक्क असणाऱ्या जीएमआरनेसुद्धा यामधील एक संघ विकत घेतलाय.

Teaser Video : जबरदस्त अॅक्शनने भरलेला रहस्यमयी थरारपट ‘बादशाहो’

क्रिकेटला लोकप्रिय करण्यासाठी ‘टी २० ग्लोबल लीग’चे आयोजन करत असल्याचा दावा दक्षिण आफ्रिका क्रिकेड मंडळ करत आहे. मात्र इतर देशांप्रमाणेच क्रिकेट मंडळ कमाईसाठी या लीगचे आयोजन केल्याचे म्हटले जात आहे. लीगमध्ये ड्वेन ब्रावो, क्रिस गेलशिवाय इतरही अनेक मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे. ‘टी २० ग्लोबल लीग’ या वर्षाअखेर खेळण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. यास्पर्धेला कितपत यश मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.