शाहरूख खान चित्रपटसृष्टीत कोणत्याही गॉडफादरशिवाय, आपल्या मेहनतीच्या जोरावर, दमदार अभिनयाच्या आधारावर स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. शाहरूख ते किंग खानपर्यंतचा त्याचा प्रवास काही सोपा नव्हता. सुरुवातीच्या काळात त्यानेही बरंच स्ट्रगल केलं. शाहरूख जेव्हा मुंबईत आला तेव्हा त्याच्याकडे काहीच नव्हते आणि आता तो बॉलिवूडचा बादशहा बनलाय. त्याचा हा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे. शाहरूखला त्याचा पहिला पगार म्हणून ५० रुपये मिळाले होते.
पहिल्या पगाराचे हे पैसे त्याने ना आईवडिलांना दिले ना प्रेयसी गौरीवर खर्च केले. या ५० रुपयांत तो आग्राला ताजमहाल पाहण्यासाठी गेला. ‘तो दिवस मी कधीच विसरणार नाही,’ असे तो सांगतो. पंकज उदास यांच्या कॉन्सर्टमधून शाहरूखला हे ५० रुपये मिळाले होते. प्रेक्षकांना त्यांच्या नियोजित जागेवर नेण्याचे काम शाहरूखने केले होते आणि त्याचेच त्याला ५० रुपये मिळाले होते. या ५० रुपयांमध्ये शाहरूख मित्रांसोबत ताजमहाल पाहायला गेला. तो अनुभव सांगताना शाहरूख म्हणाला की, ‘आग्राला गेल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती. सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. तिथे मोठ्या ग्लासमध्ये लस्सी मिळत होती. लस्सी पिल्यानंतर दिवसभर माझ्या पोटात ढवळत होतं.’
वाचा : …अन् सलमानने वाढवल्या अभिषेकच्या अडचणी
हा काळ त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. कठीण समयी पत्नी गौरीनेही त्याची खूप साथ दिली. १८ वर्षांचा असताना तो पहिल्यांदा गौरीला भेटला. एका डान्स पार्टीत त्याने गौरीला पाहिले होते. त्यानंतर काही कारणास्तव गौरी मुंबईला आली आणि तिच्यापाठोपाठ शाहरूखही मुंबईला आला. मुंबईच्या प्रसिद्ध जुहू बीचवर दोघांची पुन्हा एकदा भेट झाली. त्यानंतर २५ ऑक्टोबर १९९१ रोजी दोघेही विवाहबंधनाच अडकले.